बेळगाव दक्षिण मतदार संघातील मागील 2008, 2013 आणि 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र एकीकरण समितीने एकदा आणि भारतीय जनता पक्षाने दोन वेळा या निवडणुकीवर आपले वर्चस्व राखले होते. माजी महापौर दिवंगत संभाजीराव पाटील यांनी 2013 मध्ये तत्कालीन विद्यमान आमदार अभय पाटील यांना पराभूत करून समितीचा भगवा फडकवला होता.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील 2008, 2013 आणि 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये 2008 सालच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंग रिंगणात होते. त्यावेळी 63.66 टक्के इतके मतदान झाले आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अभय पाटील 39.96 टक्के मते मिळवून विजयी झाले.
त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी स्वतंत्र (म. ए. समिती) उमेदवार किरण सायनाक यांना 11.36 टक्के इतक्या मत फरकाने पराजित केले. किरण सायनाक यांना त्या निवडणुकीत 28.6 टक्के मते मिळाली. त्यानंतर 2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये खरी लढत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार माजी महापौर संभाजीराव पाटील आणि तत्कालीन विद्यमान आमदार अभय पाटील यांच्यात होती. त्यावेळी निवडणुकीचे मतदान 65.25% इतके झाले होते. यापैकी स्वतंत्र (म.ए.स.) उमेदवार संभाजीराव पाटील यांनी 41.25 टक्के मते मिळवून विजयी संपादन करत दक्षिणेत समितीचा भगवा फडकवला. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना 4.78 टक्के मतांनी पराभूत केले. अभय पाटील यांना 36.47 टक्के मतांवर समाधान मानून आपली आमदारकी गमवावी लागली होती.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत 62.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपची उमेदवारी पुन्हा मिळवणाऱ्या अभय पाटील यांनी यावेळी सर्वाधिक 57.59 टक्के मते मिळवून निवडणूक एकतर्फी जिंकली.
त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे एम. डी. लक्ष्मीनारायण यांना तब्बल 40 टक्के मत फरकाने पराभवाची धूळ चारली. त्यावेळी लक्ष्मीनारायण त्यांच्या बाजूने फक्त 17.59 टक्के मतदान झाले होते. या तीन निवडणुका लक्षात घेता अभय पाटील यांनी यावेळी सलग चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाची उमेदवारी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.