विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने एमसीसीसह नियुक्त करण्यात आलेल्या विविध नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेले प्रत्येक काम चोखपणे पार पाडावे, असे जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. आदर्श नीती संहिता, प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था, गणकीकरण, सायबर सुरक्षा, ईव्हीएम वापर, तक्रारी निवारण आदिंसंदर्भात विविध नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना निवडणुकीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साहित्य देण्यात आले आहे.
या खेरीज आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके स्थापण्यात आली आहेत. या पथकांच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार प्रत्येक काम बिनचूक व्यवस्थित पार पाडले जावे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तस तसा कामाचा व्याप वाढणार हे लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट बारकाईने करून आवश्यक क्रम घेतले जावेत, असेही जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
मस्टरिंग, डीमस्टरिंग आणि मतदानादिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तिचे तात्काळ निवारण केले जावे. त्या अनुषंगाने आवश्यक लेखन आणि मुद्रण साहित्याची खातरजमा करून घेतली जावी.
तसेच वाहतूक आणि अल्पोपहार जेवणाची व्यवस्था केली जावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी नितेश पाटील यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, परशुराम दुडगुंटी, लक्ष्मण बबली, निसार अहमद, राजश्री जैनापुर, श्रीशैल कंकणवाडी, प्रीतम नसलापुरे, रवी बंगारेप्पनवर, गुरुनाथ कडबूर आदी विविध समित्यांचे नोडल अधिकारी बैठकीस उपस्थित होते.