भाजपने अनेकांची तिकीटे कापल्यामुळे निर्माण झालेली एकंदर परिस्थिती सध्या वेगवेगळी वळणे घेऊ लागली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचे तिकीट कापून नवे उमेदवार रवी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार अनिल बेनके नाराज आहेत. अशा परिस्थितीत भाजप सोडून नाराज होऊन बाहेर पडलेल्या लक्ष्मण सवदी यांच्या बरोबरीने त्यांनीही काँग्रेसचा रस्ता धरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एका चार्टर प्लेन ने अनिल बेनके रवाना झाले असून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे लक्ष्मण सवदी आणि अनिल बेनके यांना घेऊन डि के शिवकुमार यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे इच्छुक माजी आमदार फिरोज शेठ आणि त्यांचे बंधू राजू शेठ यांनी आमदार अनिल बेनके यांच्या खांद्यावर घातलेला हात म्हणजे भाजपने तुझी वाट लावली आता तू माझी वाट लावू नकोस असेच सांगण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्व नेते समोरासमोर आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर फिरोज शेठ यांनी अनिल बेनके यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे फिरोज शेठ आणि राजू शेठ या दोघा बंधूंनी अनिल बेनके यांच्या खांद्यावर हात घातला. हा खांद्यावर घातलेला हात म्हणजेच पुढील आव्हानांची आणि वादळाची चाहूल लागल्याचाच प्रकार आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
अनिल बेनके काँग्रेसमध्ये जातील तर ते तिकिटाची मागणी करणार हे सत्य आहे. भाजपने लिंगायत उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनेही दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर लिंगायत प्रबळ उमेदवार काँग्रेसला मिळत नसल्यामुळे अनिल बेनके यांचाच काँग्रेसचे उमेदवार म्हणून विचार सुरू असल्याची माहिती हाती येऊ लागली आहे. या कामी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.
डि के शिवकुमार यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू असलेले चन्नराज यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून ते आज लक्ष्मण सवदी आणि अनिल बेनके यांना घेऊन चार्टर प्लेनने अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती हाती आली आहे. आपसूकच काँग्रेसचे नेते असलेल्या फिरोज शेठ यांनाही याची खबर लागली असणार त्यामुळेच त्यांनी बेनके यांच्या खांद्यावर हात घातला असावा का? असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित अनेकांना पडला आणि त्यांनी हा प्रश्न चर्चेला घेतल्याचे चित्र आहे.
अनिल बेनके विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पोटेन्शिअल चा वापर करून उत्तरचे तिकीट त्यांना देण्यासंदर्भात काँग्रेसने तयारी सुरू केली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. आणि असे झाल्यास याचा मोठा फटका सेठ बंधू ना बसणार असून त्यांची भूमिका काय असेल? हा प्रश्न गंभीरित्या उपस्थित झालाय, आणि या साऱ्या परिस्थितीत खांद्यावर घेतलेल्या हाताची जोरदार चर्चा सुरू आहे.
हात खांद्यावर घालणे या वाक्यप्रचाराचा दोन अर्थी उपयोग केला जातो. खांद्यावर हात घालणे म्हणजे एखाद्याचा पाडाव करणे किंवा एकाध्याशी मैत्री करणे. भाजपने मागील निवडणुकीत फिरोज शेठ यांच्या खांद्यावर हात घातला आणि अनिल बेनके यांना निवडून घेतले. मात्र यावेळी अनिल बेनके यांचे तिकीट कापल्यामुळे फिरोज शेठ मजबूत झाल्याची चर्चा जोरदार सुरू होती. अशा परिस्थितीत आता फिरोज शेठ यांनी अनिल बेनकेच्या खांद्यावर हात घालून मैत्रीचा हात पुढे केला की काय? असा प्रश्न निर्माण होतो.