बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनिअर सेल समन्वयक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अमित देसाई यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई मुक्कामी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला.
अमित देसाई यांनी सीमाभागातील विधानसभा निवडणुकीच्या निवड प्रक्रियेची माहिती देत अहवाल सादर केला आहे. या अहवालात इच्छुकांची माहिती देण्यात आली असून सर्व इच्छुकांची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली.
सीमाभागात प्रत्येक निवडणुकीत समितीमध्ये फूट पडून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत आहेत. यामुळे सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार ठरवून यश मिळविण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला.
यावेळी म. ए. समितीच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
समितीमध्ये होत असलेलू एकजूट पाहता समितीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करत वेळप्रसंगी आपण निवडणुकीसाठी सीमाभागात सक्रिय मार्गदर्शन करण्यासाठी तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे, अशी माहिती अमित देसाई यांनी दिली.