बेळगाव शहर आणि परिसरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही कामे अर्धवट टाकून अनेकांची डोकेदुखी वाढवण्यात येत आहे. रस्ता चकाचक करण्यात येत असला तरी त्याच्या बाजूला असलेल्या चरी मात्र उघडे ठेवण्यात येत असल्याने रस्ते चकाचक पण साईडपट्ट्या उखडलेल्या असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
शहर आणि परिसरात अनेक रस्त्यांच्या मागणीसाठी हेलपाटे निवेदने आणि आंदोलने ही नित्याचीच बाब असली तरी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामांना चालना देण्यात आली आहे. रस्ते चकाचक करण्यात येत असली तरी बाजूला खोदाई करण्यात आलेला रस्ता तसाच टाकून देण्यात येत आहे. या ना त्या कारणाने कोणतीही वायर केबल जाण्यासाठी रस्ते शेजारीच खोदाई करण्यात येत असते. मात्र ती खोदाई व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्यांची अवस्था पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी झाली आहे.
केबल घालण्यासाठी डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था करून सोडण्यात येत आहे. मात्र खोदाई करण्यात आली तरी ती तसेच उघड्यावर टाकून देण्यात येत असल्याने रस्ता पूर्ण खराब होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र महानगरपालिका याकडे साफ दुर्लक्ष करत असते. ठेकेदार आणि कंत्राटदारही याला सहकार्य करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेळगावात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे हाती घेण्यात येत असली तरी खोदण्यात आलेल्या चरी कधी एकदा भरणार हा देखील नागरिकांना भेडसावणारा प्रश्न आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक रस्ते डांबरीकरण करण्यात येत आहेत. मात्र केबल च्या नावाखाली रस्त्यांची त्रेधातिरपट उडविण्यात कंत्राटदार धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी अशा घटना थांबाव्यात व रस्ता योग्य प्रकारे चकचकीत ठेवावा याचबरोबर बाजूने करण्यात आलेल्या चरीही बुजवून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.