बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असून या निमित्त मंदिराला करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये श्री दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीसाठी मंदिराला अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून नेत्रदीपक अशी ही विद्युत रोषणाई सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी दूरवरून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नित्यपूजा, अभिषेक, महाआरती तसेच होम हवन आदी विशेष धार्मिक विधींसह नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरात भजन, कीर्तन तसेच अन्य विभिन्न कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
श्री ज्योतिबा मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाबद्दल बेळगाव लाईव्हला माहिती देताना श्री ज्योतिबा डोंगराची पुजारी लक्ष्मण प्रभाकर गुणे म्हणाले की, सालाबाद प्रमाणे शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यामध्ये श्री ज्योतिबा देवाची कमल पुष्पारतीने अखंड नऊ दिवस पूजा बांधण्यात येते या पूजेचे वैशिष्ट्य आणि माहात्म्य असे की देवाचे परमभक्त आणि अष्टभैरवांमधील भैरवांनी देवाकडे वरदान मागितले होते, की हिमालयामध्ये सरस्वती प्रकट झालेल्या सरोवरातील कमल पुष्पाद्वारे आम्ही प्रतिवर्षी तुमची पूजा करू. तेव्हा देवाने त्यांना तथास्तु म्हणून ते वरदान दिले होते त्यामुळे या शादीय नवरात्रोत्सवात श्री ज्योतिबा देवांची प्रत्येक दिवशी कमळ पुष्पात विशेष पूजा केली जाते.
याव्यतिरिक्त सदर श्री जोतिबा मंदिरामध्ये पहाटेपासून अभिषेक देवाची अलंकारिक खळी अशी राजेशाही थाटाची महापूजा होण्याबरोबरच सायंकाळी महारतीनंतर शेजारती करून दिवसभरातील धार्मिक विधींची सांगता होते, असे पुजारी गुणे यांनी सांगितले
शिवबसवनगर श्री ज्योतिबा मंदिराचे अध्यक्ष ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी यावेळी बोलताना सर्वप्रथम श्री जोतिबा मंदिरातील नवरात्र उत्सव आणि मंदिराच्या सजावटीचे उत्तमरीत्या प्रसारण केल्याबद्दल बेळगाव लाईव्हला धन्यवाद दिले. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षापासून समस्त बेळगावकरांच्या सहकार्याने या श्री ज्योतिबा मंदिराचे काम अद्यापही सुरू आहे. दानशूर व्यक्ती आणि भाविकांनी दिलेल्या देणगीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विनियोग करून या मंदिराची उभारणी करण्यात येत आहे.
वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या देणगीसाठी आम्हाला आजतागायत कधीही दारोदारी फिरावे लागलेले नाही. भक्तांनी स्वखुशीने, स्वयं स्फूर्तीने देणग्या दिल्या असून त्यातून मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिराचे जे देणगीदार आहेत त्यांनी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेऊन केलेली मागणी पूर्ण झाल्यानंतरच देणगी दिलेली आहे. थोडक्यात नवसाला पावणारे असे हे मंदिर आहे.
या ठिकाणी जी मागणी केली जाते ती पूर्ण होते अशी लाखो भक्तांची भावना आहे अशी माहिती देऊन सदर मंदिराचे बांधकाम अद्यापही पूर्ण व्हावयाचे असल्यामुळे भाविकांसह दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन ॲड. येळ्ळूरकर यांनी केले.