बेळगाव लाईव्ह विशेष : शिक्षण क्षेत्र हे विद्या दान देण्याचे क्षेत्र आहे मात्र आजच्या सिस्टीम मधील सर्वच विभाग हे भ्रष्टाचाराने व्यापलेले आहेत.
बेळगावचे शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे शुक्रवारी 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले त्यामुळे बेळगावातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे येऊ लागला आहे.त्यातल्या त्यात बेळगावची डी डी पी आय ही पोस्ट खूप मलाई मिळणारी आहे त्यामुळेच की काय अनेक अधिकारी हे पद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. गेल्या काही महिन्यापूर्वी याचं पदावरून तत्कालीन डी डी पी आय ए बी पुंडलिक आणि नलतवाड यांच्या रस्सीखेच होती इतकेच काय तर पुंडलिक यांच्यावर देखील अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. डी डी पी आय वर कारवाई झाली मात्र त्या कार्यालयातील सरकारी बाबू वर कधी कारवाई होणार हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराने बरबटल्याची चर्चा अनेकदा कानी येत होती. मात्र, आज लोकायुक्त पोलिसांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर छापा टाकून जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नालतवाड यांना एका खाजगी शिक्षण संस्थेकडून लाच घेताना रंगेहात पकडल्याने बेळगाव शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
लोकायुक्त पोलीस जिल्हा शिक्षण अधिकारी ( डीडीपीआय) कार्यालयात डीडीपीआय नालतवाड यांची झाडाझडती घेत असून लाच घेताना नालतवाड रेड हॅन्ड सापडल्याने आता त्यांच्या कु कर्माचा घडा भरल्याची कुजबुज कार्यालयाबाहेर ऐकू येत होती.
नवीन शाळा परवानगी असो, प्रथम मान्यता असो की शाळेचे रिन्यूअल असो, जिल्हा शिक्षण अधिकारी हे कार्यालयातील टेबल क्लार्क आणि व्यवस्थापक आदी महाबागांना हाताशी धरून टेबल खालून पैशाची मागणी करतात असे वृत्त होते. मात्र याकडे वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला होता.
जिल्हा शिक्षण अधिकारी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून अक्षरशा खाजगी शाळा व्यवस्थापनांची गळचेपी व्हायची आणि पिळवणूक देखील व्हायची. पैशाशिवाय फाईल हालत नाही असा आरोप अनेक शिक्षण संस्थांकडून केला जायचा. या कामासाठी कार्यालयातील धेंडांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील चहाची टपरी आणि समोरील उद्यानालाच लेनदेन कार्यालय बनविले असल्याचे बोलले जात होते. मात्र, सरावलेले डीडीपीआय तसेच व्यवस्थापक आणि टेबल क्लार्क हे आमचे कोण वाकडे करणार अशा अविर्भावात वावरायचे.
आज याचा भांडाफोड झाला आणि बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नालतवाड हे लोकायुक्त पोलिसांच्या कचाट्यात रंगेहात सापडल्याने नालतवाड यांच्यासह कार्यालयात देवाण घेवाणीचे रॅकेट चालविणाऱ्या महाभागांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी नालतवाड यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात आपली मक्तेदारी चालवली असून व्यवस्थापक आणि सेकंड डिव्हिजन क्लर्क च्या माध्यमातून त्यांनी आपले भ्रष्टाचाराचे जाळे विणले असल्याची चर्चा खुद्द शिक्षणाधिकारी कार्यालयात केली जात होती. मात्र, यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने निर्भयपणे आणि बिन भोभाटपणे यांची कामे चालू होती, अशी कुजबुजही ऐकू येत होती. कदाचित यामुळेच, आपले कोणीच वाकडे करू शकत नाही अशा अविर्भावात कार्यालयातील अधिकारी शिक्षण संस्थांच्या संचालकांकडे पैशाची मागणी करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अखेर आज पापाचा घडा भरला.
चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी डीडीपीआय बसवराज नालतवाड या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना रंगे हात पकडले असून त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात येत होती.
बसवराज नालतवाड हे जिल्हा शिक्षणाधिकारी अधिकारी असल्याने झाडाझडती दरम्यान लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून दक्षता घेण्यात येत होती तसेच विचारपूर्वक पाऊल टाकण्यात येत होते. यामुळे बाहेर उभे असलेल्या पत्रकारांना माहितीसाठी ताटकळत उभे राहावे लागले होते. नालतवाड हे एक केएएस अधिकारी असल्याने या प्रकरणावर कदाचित पडदा टाकला जाईल किंवा प्रकरण मिळमिळीत केले जाईल अशी कुजबुजही कार्यालय बाहेर कानी पडत होती. पण, बसवराज नालतवाड एक भ्रष्ट अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी अपेक्षाही खुद्द कार्यालयातील कर्मचाऱ्यांतून व्यक्त होताना ऐकू येत होती. इतकेच नाही तर, व्यवस्थापक आणि 12 वर्षांपासून एकाच जागी सेवा बजावणाऱ्या आणि नालतवाड यांना भ्रष्टाचारात हातभार लावणाऱ्या ‘ त्या ‘ महिलेची झाडाझडतीही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे बोलले जात होते.
याआधी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बसवराज नालतवाड यांना नोटीस बजावली होती. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नालतवाड यांच्या कामकाजाबद्दल आणि कर्तव्य कसुरतेबद्दल असमाधान व्यक्त करताना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये याबद्दल कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती. मात्र यानंतर माशी नेमकी कोठे शिंकली हे समजले नाही आणि हे प्रकरण पद्धतशीरपणे थंडावले होते. त्यानंतर नालतवाड यांच्या बदलीची चर्चा खूपच गाजली. मात्र त्यांनी कोणाचे खिसे ओले केले की जादू केली कोण जाणे, पुन्हा बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातच त्यांनी आपली वर्णी लावून घेतली. त्यांच्या कामकाजाबद्दल आणि कर्तव्य कसूरतेबद्दल त्यांना याआधी दोन नोटीस धाडण्यात आल्याचे वृत्त होते. पण, आता लोकायुक्त पोलिसांच्या छाप्यात चाळीस हजार रुपयांची लाच घेताना ते रंगेहात सापडले असल्याने त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.