बेळगाव लाईव्ह:चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कारने ठोकल्यामुळे कारसह ऑटोरिक्षा व दुचाकीचे नुकसान झाल्याची तसेच या तीनही वाहनांच्या धडकेने विजेच्या खांबावरील टीसी खाली कोसळल्याची घटना आज पहाटे पांगुळ गल्ली येथे घडली.
शहराच्या मध्यवर्तीय भागात असलेल्या पांगुळ गल्लीत आज शनिवारी पहाटे 6 वाजता चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने रस्त्याशेजारी पार्क केलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली. ही धडकी इतकी जोराची होती की ऑटोरिक्षा समोरील दुचाकीला धडकून तिच्यासह विजेच्या खांबावर जाऊन आदळली.
वाहनांच्या या तिहेरी अपघातात कारगाडीसह ऑटो रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले आहे. कारसह ऑटोरिक्षा व दुचाकीची विजेच्या खांबाला बसलेली धडक इतकी जबरदस्त होती की खांबावरील टीसी खाली कोसळून त्याचा स्फोट झाला.
परिणामी ऐनसणासुदीत पांगुळ गल्लीसह परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पांगुळ गल्ली ही नेहमी गजबजलेली असते. मात्र पहाटेच्या वेळी गल्लीतील रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे अपघातात सुदैवाने कोणालाही अपाय झाला नाही.