बेळगाव लाईव्ह :हत्तरगी महामार्गाचा बायपास रोड असलेल्या रस्त्यावरील धोकादायक गतिरोधक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी श्रमदानाने पांढरा रंग लावून सुरक्षित केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सुतगट्टी ते हत्तरगी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. हत्तरगी महामार्गावरील शेजारी बायपास रोड आहे. मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या गेल्या एक महिन्यांपासून वाहतूक या मार्गे होत आहे.
हत्तरगी टोल नाक्या पासून वाहतूक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना बायपास रस्ता मार्गे वळण्यात येत आहे. तथापी बायपास रस्तावर कंत्राटदारकडून कोणत्याही सुचना फलक लावण्यात आलेला नाही. तसेच या रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) असूनही माहिती फलका अभावी व रंगरंगोटी नसल्यामुळे तो वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत होता.
जवळच हत्तरगी बसस्थानक असल्यामुळे या रस्त्यावर बसेसची आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या खेरीज स्थानिक नागरिकांकडून शाळा, कॉलेज, दुकाने, बँक या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता वापरला जातो. भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांना बऱ्याचदा गतिरोधकाचा अंदाज येत नव्हता. हीच परिस्थिती दुचाकी आणि चार चाकी वाहनांची होत होती.
अतिवेगात येणाऱ्या वाहन चालकांना गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे विशेष करून संध्याकाळच्या वेळी अपघात घडत होते. जागरूक सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी याची दखल घेत श्रमदानाने त्या गतिरोधकाला पांढरा रंग लावून तो सुरक्षित केला.
याबद्दल हत्तरगी येथील मल्लिकार्जुन आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रसाद चौगुले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष करून श्री बसवेश्वर बँकेने चौगुले यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.