बेळगाव लाईव्ह :यंग बेलगाम फाउंडेशन या सेवाभावी संघटनेकडून हिंडलगा कारागृहासमोरील रस्त्यावर असलेल्या धोकादायक दुभाजकाच्या ठिकाणी धोक्याची पूर्वसूचना देणारा फलक उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
हिंटलगा मध्यवर्तीय कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी हॅलोजन लॅम्प सारखे मोठे पथदीप किंवा रिफ्लेक्टर्स लावण्यात आले नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत होते.
या संदर्भात संबंधितांना वेळोवेळी माहिती देऊन देखील त्याची दखल घेतली जात नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून भेडसावणाऱ्या या समस्येच्या बाबतीत अखेर यंग बेळगाव फाउंडेशनने पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा कारागृहासमोरील धोकादायक दुभाजकाच्या ठिकाणी धोक्याची पूर्वकल्पना देणारा फलक उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
यावेळी गंगाधर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रस्त्यावरील अशा धोक्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सूचना फलक उभारले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
ॲलन विजय मोरे यांनी यावेळी बोलताना संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा समस्यांकडे प्रशासनाने एक तर स्वतः लक्ष द्यावे अथवा तात्काळ कार्यवाही करण्यासाठी यंग बेळगाव फाउंडेशनला त्याची माहिती द्यावी.
आम्ही या पद्धतीच्या समस्या सोडवण्यास सज्ज आहोत असे स्पष्ट केले. दुभाजकाच्या ठिकाणी फलक उभारते वेळी ॲलन यांच्यासह अद्वैत चव्हाण -पाटील, ओमकार कांबळे, अमित महाराज, संजय कुंडेकर यांच्यासह यंग बेळगावचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.