महसूल खात्याच्या कागदपत्रातील मूळ नावात बदल करणे हा गुन्हा आहे. तसा बदल करून घेणारे व देणारे गुन्हेगार ठरत असल्यामुळे दोघांवरही कारवाई केली जाईल. तसेच यासंदर्भात महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महसूल खात्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेंगलोर येथे विधानसभेच्या शून्य तासांमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कुडेकल (जि. यादगिरी) गावातील सर्व्हे नं. 72 मधील 15 एकर 10 गुंठे जमीन कृष्णभाग्य जल पुरवठा योजनेसाठी भूसंपादित करण्यात आली असून त्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
मात्र यामध्ये कागदपत्रांमधील मूळ नावात बदल करून तेथील तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. याप्रकरणी संबंधित महसूल अधिकारी व ग्राम लेखाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि तहसीलदारावर मात्र कोणतीच कारवाई झालेले नाही. तेंव्हा त्याला तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यावर महसूल मंत्री गोविंद कारजोळ यांनी सदर प्रकार आता प्रथमच आपल्या कानावर आला आहे असे सांगितले. भूसंपादनाची प्रक्रिया महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. तहसीलदार किंवा त्याच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना ते अधिकार नाहीत. तेंव्हा संबंधित तहसीलदारावर वारंवार तात्काळ कारवाई करण्याची सूचना केली जाईल. तसेच यादगिरी जिल्हाधिकाऱ्यांना अदा केलेली नुकसान भरपाईची रक्कम पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करून घेण्यास सांगितले जाईल, असे सांगितले.
महसूल खात्याच्या कागदपत्रातील मूळ नावात फेरफार करणाऱ्यांवर आणि करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यासंदर्भात महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही महसूल मंत्री गोविंद कारजोळ यांनी सभागृहात स्पष्ट केले.