महाराष्ट्रातील मराठा आरक्षणामध्ये सीमा भागातील मराठी माणसाचा पूर्वीपासून समावेश आहे. या खेरीज महाराष्ट्रातील मराठा समाजाला मिळणाऱ्या सर्व सोयी -सुविधा सीमाभागातील मराठी बांधवांना लागू असून त्या संदर्भात लवकरच जनजागृतीचे कार्य हाती घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मराठा आरक्षण समन्वयक, सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण याचिकाकर्ते कोल्हापूरचे दिलीप पाटील यांनी दिली.

ते बेळगावला आले असता त्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने दिलीप पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षण व इतर बाबीं बाबत त्यांचे मत जाणून घेतले. त्यावेळी पाटील बोलत होते. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा सीमावासीयांना कसा फायदा होणार? या संदर्भात बोलताना त्यांनी सदर आरक्षणामध्ये पहिल्यापासून सीमा भागातील मराठी माणसाचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ज्या सोयी सुविधा मिळतात त्या सर्व सीमाभागातील मराठी लोकांसाठी लागू आहेत. म्हणजे जर सीमाभागातील एखादा विद्यार्थी परदेशी शिक्षणात जात असेल तर त्याची शैक्षणिक फी, हॉस्टेल खर्च, येण्या-जाण्याचा खर्च वगैरे सर्वकांही महाराष्ट्र शासनाकडून मिळू शकते. परदेशाएवजी जर कोणी पुणे, मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी जात असेल तर त्याची हॉस्टेल फी 50 टक्के माफ केली जाते, म्हणजे 50 टक्के खर्च महाराष्ट्र सरकार उचलते, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.
तिसरी गोष्ट सीमा भागात तुम्ही कांही उद्योग सुरू करणार असाल. म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवर उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर 15 लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ केले जाते. या पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्या सर्व सीमाभागातील मराठी बांधवांसाठी लागू आहेत. त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नवउद्योजकांनी लाभ करून घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या संबंधित योजना आणि सोयीसुविधांबाबत सीमा भागात जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील संबंधित समन्वयक किंवा सरकारी यंत्रनेशी समन्वय साधून लवकरच बेळगाव शहरासह सीमाभागातील 865 गावांमध्ये शिबिर वगैरे भरून जनजागृती करणार आहोत, असे ते म्हणाले.
गरिबी रेषेखालील लोकांनी सरकारने त्यांच्यासाठी ज्या योजना अथवा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. मराठी लोकांनी सरकारच्या योजना सोयी ‘सुविधांचा प्रथम लाभ करून घ्यावा. आरक्षण मिळाल्यानंतर नोकरीत राखीवता ही मिळतेच. पूर्वी मराठा समाज बांधवांकडे मोठ्या शेतजमिनी असायच्या, शेतीचे उत्पन्न मोठे असायचे. त्यामुळे मराठा समाज सधन होता. मात्र कालांतराने त्या 50, 100, 200 एकर जमिनी आता गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे आता नोकरी किंवा उद्योगाशिवाय पर्याय नाही हे सीमा भागातील मराठी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून मराठा समाजाने स्वतःच्या प्रगतीसाठी सरकारच्या सोयीसुविधा आणि योजनांचा लाभ करून घेतलाच पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत बोलताना महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते असलेल्या दिलीप पाटील यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील सर्व जण खंबीरपणे उभे आहोत. न्यायालयीन लढाई वकील लढत असले तरी सीमाप्रश्नी इतर लढायांमध्ये आम्ही कायम मराठी माणसाला पाठिंबा दिला आहे असे सांगून सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक जण ठामपणे उभा आहे हा इतिहास आहे, असे शेवटी स्पष्ट केले.