बेळगाव लाईव्ह |
बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरातील नेहरू रोडवरील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर टिळकवाडी पोलिसांनी धाड टाकून तेलंगणातील एका तरुणीची सुटका केली आहे. या प्रकरणी व्यवसाय चालवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेची ओळख आयेशा शब्बीर शेख ऊर्फ रेश्मा अंकलेवाले (वय 31) अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने अपार्टमेंटमधील घर भाड्याने घेऊन तेथे तेलंगणातील एका तरुणीला ठेवले होते. ग्राहकांना थेट घरात बोलावून अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
विश्वसनीय माहितीच्या आधारे सीपीआय परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने छापा टाकून संबंधित तरुणीची सुटका केली आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी अत्यल्प रक्कम पीडित तरुणीला देऊन उर्वरित पैसे आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PIT Act) 1956 अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




