बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांची संयुक्त बैठक गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
सीमाप्रश्नाच्या लढ्याला महाराष्ट्रातून अधिक व्यापक पाठबळ मिळावे तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती व्हावी, या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके यांनी सांगितले की, सीमालढा केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातूनही तो लढला गेला पाहिजे. महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबाबत सातत्याने जनजागृती होणे आवश्यक असून, पुणे विभाग समितीने गेल्या सहा महिन्यांत सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेत सीमावासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे काम केले आहे. भविष्यातही महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाबाबत जागृत ठेवण्यासाठी आणि व्यापक जनजागृतीसाठी पुणे विभागाने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अल्पावधीत पुणे विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे विभाग समितीचे विश्वनाथ पाखरे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत निवेदने देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच या माध्यमातून पुणे विभागात करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती त्यांनी बैठकीत मांडली.

गणपती पाटील यांनी पुणे येथे सीमाप्रश्नाच्या संदर्भात आंदोलन हाती घेतल्यास पुणे विभाग समिती त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून सीमाप्रश्नाबाबत जनजागृतीच्या कार्याला सुरुवात करणाऱ्या पुणे विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ‘लढा नाहीतर गुलामीची सवय होईल’ हे ब्रीदवाक्य असलेल्या मानचिन्हासह त्यांचा गौरव करण्यात आला.
बैठकीला युवा समितीचे नगरसेवक व खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, इंद्रजित धामणेकर, सागर कणबरकर, रणजित हावळानाचे, निलेश काकतकर, सुरज जाधव, सुनील पाटील, मनोज बेळगुंदकर, वैभव कुट्रे, विनायक पवार, अभिजित मजुकर, राजू पाटील, अभिषेक कारेकर, विशाल कुंडेकर तसेच पुणे विभागाचे सातेरी पाटील, वैराळ सुळकर, विठ्ठल पाखरे, भुजंग पाखरे, बाळकृष्ण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





