बेळगाव लाईव्ह: देसूर गावातील हॉट पॉट ढाब्याजवळ अवैधरीत्या पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना CCB पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह सुमारे १,८०० लिटर पेट्रोल-डिझेल आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१७ सप्टेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली CCB विभागाचे PI मंजनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. देसूर येथील हॉट पॉट ढाब्याजवळ अशोक लेलँड गुड्स वाहन क्रमांक KA-22/AA/7460 मध्ये पेट्रोल आणि डिझेलचा अवैध साठा करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी तमीम हसनसाब यरगट्टी, रा. अमननगर, बेळगाव आणि साकीब शमीम अन्सारी, रा. वैभवनगर, बेळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे आरोपी इस्रार मुल्ला, रा. टी.व्ही. सेंटर, हनुमाननगर, बेळगाव यांच्या सांगण्यावरून पेट्रोल-डिझेलची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून घेऊन जात होते.
पोलिसांनी कारवाईदरम्यान ५ बॅरलमधील सुमारे ९०० लिटर पेट्रोल, अंदाजे ९९ हजार रुपये किमतीचे, तसेच ५ बॅरलमधील सुमारे ९०० लिटर डिझेल, अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे जप्त केले. कोणतीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था न करता हा साठा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आवश्यक वस्तू कायदा, पेट्रोलियम कायदा, मोटर स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल कायदा तसेच BNS कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल CCB विभागाचे PI मंजनाथ नाईक, PSI मंजनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्तांनी कौतुक केले.





