बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील पावसाची कमतरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५३ तालुक्यांची तिसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष पीक नुकसान सर्वेक्षणासाठी निवड केली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी, बैलहोंगल, बेळगाव, चिक्कोडी, रायबाग, कित्तूर, निपाणी, मुडलगी आणि यरगट्टी या तालुक्यांमध्ये शेतावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली जाणार आहे.
GPS आणि मोबाइल ॲपद्वारे सर्वेक्षण
पीक नुकसानीचे सर्वेक्षण अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी Crop Loss GT Special Mobile Appचा वापर केला जाणार आहे. सर्वेक्षणादरम्यान शेताची GPS माहिती, छायाचित्रे, जमिनीचा तपशील आणि पिकाच्या नुकसानीचे क्षेत्र यांची नोंद मोबाइल ॲपवर केली जाणार आहे.
३३ टक्के नुकसान असल्यास दुष्काळाचा विचार
प्रत्यक्ष पाहणीत एखाद्या तालुक्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पीक नुकसान आढळल्यास संबंधित तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी विचारात घेतला जाईल. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आढळल्यास गंभीर दुष्काळाच्या श्रेणीत समावेश करण्याची तरतूद आहे.
यापूर्वी राज्यातील १०२ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर ८९ तालुके गंभीर आणि १२ तालुके सामान्य दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते.

१९ आणि २० सप्टेंबरला शेतांमध्ये पाहणी
निवडलेल्या गावांमध्ये सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करून १९ आणि २० सप्टेंबरला प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. २१ सप्टेंबरला सर्वेक्षण पूर्ण करून फॉर्म क्रमांक ११ द्वारे अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील या नऊ तालुक्यांमधील पीक नुकसानीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, नुकसानाच्या प्रमाणानुसार पुढील दुष्काळी उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.





