बेळगाव लाईव्ह : खानापूर वन उपविभागात गेल्या आठवडाभरापासून हत्तींचा कळप ठाण मांडून असल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हत्तींच्या कळपाला पुन्हा जंगलात हुसकावण्यासाठी वनाधिकाऱ्यांकडून गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या वेळी ‘कुबिंग’ मोहीम राबविण्यात येत आहे.
या कळपात सुमारे ९ हत्ती असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. बुधवारी रात्री खानापूरचे सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी बसवराज वाळद आणि वनक्षेत्र अधिकारी सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर मोहीम राबविण्यात आली. यावेळी हत्तींचा कळप भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भातशेतीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.
खानापूर उपविभागातील पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोळीवाडा परिसरात हत्तींचा वावर दिसून येत आहे. कळपात एक नर हत्ती, दोन पिल्ले आणि इतर हत्तींचा समावेश असून, बुधवारी रात्री पाली गावाजवळ तब्बल सात हत्ती दिसून आले.
हत्तींना जंगलात परतविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी फटाके तसेच आवाज करणारे फटाके फोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्ती इकडून तिकडे फिरत राहिले आणि जंगलात परतण्याऐवजी भातशेतांच्या कडेला फिरत राहिल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचीही मदत घेतली जात आहे.
भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळ रस्त्याच्या कडेला हत्तींचा कळप दिसल्याने काही दुचाकीस्वार घाबरून तेथून निघून गेले. वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत हत्तींचा कळप तेथून निघून गेला होता.
बेळगाव वनविभागाच्या हद्दीत प्रथमच हत्तींच्या कळपाचा असा वावर आढळून आला आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हत्तींच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी बसवराज वाळद यांनी दिली.

भातशेतीमध्ये फिरून हत्तींकडून पिकांचे नुकसान होत असल्याने वनविभागाने नुकसान झालेल्या शेतांची आणि शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पीक नुकसानीची भरपाई वनविभागाकडून दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हत्तींचा हा कळप हळियाळ, कॅसलरॉक, जगलपेट, तिनईघाट आणि गणेशगुडी परिसरातील जंगलातून अन्नाच्या शोधात खानापूर वनक्षेत्रात दाखल झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कळपात नर हत्तीसोबत पिल्ले असल्याने हा कळप अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी वनाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हत्तींच्या जवळ जाऊ नये, आरडाओरड करू नये किंवा फटाके फोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हत्तींच्या कळपाला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात परतविण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि हत्ती दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन डीसीएफ एन. ई. क्रांती यांनी केले आहे.





