बेळगाव लाईव्ह: कित्तूर तालुक्यातील अवराडी गावात मालमत्तेच्या वादातून ग्रामपंचायत कार्यालयातच बाप-लेकीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांची नावे रुद्रप्पा शिवण्णा कुंदरगी (६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (२६) अशी आहेत. रुद्रप्पा हे माजी सैनिक होते. या हल्ल्यात राहुल लोकंडे (२८) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील जमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. ३८ गुंठे जमिनीच्या वाटणीसंदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतर रुद्रप्पा हे जमिनीच्या नोंदीसंबंधी अर्ज आणि कागदपत्रांच्या कामासाठी अवराडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यांच्यासोबत मुलगी शशिकला आणि अन्य व्यक्तीही होती.
याचवेळी रुद्रप्पा यांचे भाऊ बसप्पा कुंदरगी, संगप्पा कुंदरगी आणि पुतण्या मडीवालप्पा कुंदरगी यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून शशिकला त्यांना वाचवण्यासाठी धावली असता तिच्यावरही हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेत रुद्रप्पा आणि शशिकला यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे जमा केले आहेत.
घटनेनंतर संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हे प्रकरण मालमत्तेच्या जुन्या वादातून घडल्याचा प्राथमिक पोलिसांचा संशय आहे.





