belgaum

१८,१०२ सुपाऱ्यांतून साकारला बाप्पा; हे मंडळ ठरतेय पर्यावरणाचा आदर्श!

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक मूर्ती, भव्य सजावट आणि उत्साह… पण या सगळ्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत काही गणेश मंडळे वेगळा आदर्श निर्माण करत आहेत. बेळगावातील नानावडी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याच परंपरेत गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहे.


यंदा या मंडळाने तब्बल १८ हजार १०२ सुपाऱ्यांचा वापर करून गणेशमूर्ती आणि सजावट साकारली आहे. त्यामुळे ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ टिपताना दिसत आहेत.
या मूर्तीच्या सजावटीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सलग सुमारे २० दिवस मेहनत घेतली.

मनीष पाटील, सचिन नंदेश्वर, सुनील पाटील, आरती पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सजावटीचे काम पूर्ण केले.
या मंडळाची आणखी एक विशेष बाब म्हणजे गेल्या १४ वर्षांपासून मूर्तिकार मारुती कुंभार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर करून गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जातो.

 belgaum


मात्र नानावडी मंडळाचा गणेशोत्सव केवळ मूर्ती आणि सजावटीपुरता मर्यादित नाही. मोफत मेडिकल कॅम्प, स्वच्छ भारत अभियान, चित्रकला स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यांसारखे सामाजिक उपक्रमही दरवर्षी राबवले जातात. यंदाही डॉ. अनिल पाटील यांच्या सहकार्याने मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच २० सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सामाजिक बांधिलकी… या तिन्हींचा सुंदर संगम नानावडीच्या गणेशोत्सवात पाहायला मिळतो. त्यामुळे ‘उत्सव साजरा करताना पर्यावरणाचीही काळजी’ हा संदेश देणारे नानावडीचे गणेश मंडळ यंदाच्या गणेशोत्सवात विशेष लक्ष वेधून घेत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.