बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे घडलेल्या भीषण अग्निकांडाने दमोने कुटुंबाचा अक्षरशः संसार उद्ध्वस्त झाला आहे. आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाचाही बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता सहा झाला आहे.
मृतांची नावे गजानन राजाराम दमोने आणि त्यांचा मुलगा रोशन गजानन दमोने अशी आहेत. दोघांवर बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गंभीर भाजल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर बुधवारी उपचारादरम्यान दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.
बेळगाव लाईव्हने या दुर्घटनेनंतर प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चव्हाट गल्लीतील दमोने कुटुंबाच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत शारदा दमोने, भारती दमोने, प्रिया दमोने आणि गंगा दमोने यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. तर गजानन दमोने आणि रोशन दमोने हे गंभीर जखमी झाले होते.
काही क्षणांत घराला आगीचा वेढा
गणेश चतुर्थीच्या उत्साहात असलेल्या दमोने कुटुंबावर ही दुर्घटना काळ बनून आली. मध्यरात्रीच्या सुमारास घरातून मोठा आवाज झाल्यानंतर अचानक आग भडकली. काही क्षणांत आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. घरातील सदस्य झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
शेजाऱ्यांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी गजानन आणि रोशन यांना आगीतून बाहेर काढण्यात यश आले; मात्र दोघेही गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांना मोठ्या प्रमाणात भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या.

फ्रिजच्या स्फोटाचा संशय; तपास सुरू
या दुर्घटनेत घरातील फ्रिजचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृत तपासातून निश्चित झालेले नाही. घटनास्थळी FSL पथक आणि HESCOMच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली होती.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत सुरुवातीला चार महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या गजानन राजाराम दमोने आणि रोशन गजानन दमोने यांच्या मृत्यूने दमोने कुटुंबावरील संकट आणखी गडद झाले आहे.
गजानन राजाराम दमोने आणि रोशन गजानन दमोने या बाप-लेकाच्या मृत्यूने या भीषण अग्निकांडातील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या काळात घडलेल्या या घटनेने चव्हाट गल्ली परिसरासह संपूर्ण बेळगाव शहरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, आमदार असिफ सेठ तसेच माजी आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. पीडित कुटुंबीयांना शासकीय मदत आणि पुनर्वसनाबाबतही चर्चा करण्यात आली होती.





