गोकाक (जि. बेळगाव) येथील आपले सराफी दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य महामार्गाच्या ठिकाणी अचानक हल्ला करून त्यांच्याकडील सुमारे 35 लाखाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केलेल्या 10 लुटारूंना पोलिसांनी अवघ्या दहा दिवसात गजाआड केले आहे.
संजीव सदानंद पोतदार आणि रवींद्र सदानंद पोतदार हे दोघे गेल्या 18 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास गोकाकमधील आपले सराफी दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी सिंधी कुरबेटला जात होते. त्यावेळी चार दुचाकी गाड्यांवरून आलेल्या दरोडेखोरांनी राज्य महामार्गावरील घटप्रभा साखर कारखान्यानजीक करियम्मा मंदिराजवळ पोतदार बंधूंच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर तोल जाऊन पडलेल्या पोतदार बंधूंवर हल्ला करून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोतदार बंधूंनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी रोडनी मारहाण करून दोघांनाही जखमी केले. तसेच सोन्याचे दागिने आणि रोख 2 लाख 80 हजार रुपये हिसकावून घेऊन पलायन केले.
याप्रकरणी वेगाने तपास करत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता लुटीचे धागेदोरे हाती लागले. तसेच पोलिसांनी संशयितांना आपला खाक्या दाखवताच त्यांनी लुटीचा गुन्हा देखील कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 240 ग्रॅम सोने 44 हजार रुपये रोख सराफी बंधूंना मारहाण करण्यासाठी वापरलेला रॉड गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकली व मोबाईल जप्त केले. या खेरीज याच प्रकरणातील अन्य चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील 35 लाख 500 रुपये किमतीचे 71 ग्रॅम सोने आणि 6 लाख रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी आणि गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्यासह तपास करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.