गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरच्या गजरात दीड दिवसाच्या गणपतीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. बाप्पाचा जय घोष, ढोल ताशांचा गजर,फटाक्यांची आतिषबाजी आणि भक्तांचा उत्साह अशा वातावरणात मात्र जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.
बेळगाव शहरातील विविध विसर्जन तलावामध्ये दुपारपासून बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री पर्यंत वाजत गाजत विसर्जन मिरणुक काढून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
बुधवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.प्रामुख्याने ब्राम्हण, सोनार तसेच परंपरेनुसार घरगुती दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले शिवाय महापालिकेने करून दिलेल्या विसर्जन कुंडामध्ये देखील सोयीनुसार अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिमा डोळ्यात साठवत तसेच सेल्फी काढत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. प्रामुख्याने बालचमू आणि बाप्पाचा जयघोष हे चित्र विसर्जन तलावावर पाहायला मिळत होते. इतर दिवसांच्या तुलनेत दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाची संख्या कमी असल्याने भक्तांनी बाप्पाची विधिवत पूजा व आरती करून भावपूर्ण निरोप दिला.