कोविड आटोक्यात येत नाही तोच मन्कीपॉक्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं. अशातच आता जनावरांना होणाऱ्या लंपीस्किन या त्वचारोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून आता याचा धोका कर्नाटकात आणि पर्यायाने जिल्ह्यातही घोंगावत आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी आतापर्यंत १७० जनावरांना या रोगाची लागण झाली आहे, अशी आकडेवारी पशुसंगोपन खात्याकडून उपलब्ध झाली आहे.
केवळ गाय, बैल आणि वासरांना होणाऱ्या या रोगाची लागण आता म्हशींनाही होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७० जनावरांना या रोगाची लागण झाली असून यामध्ये १६८ गायी, बैल, वासरे तर दोन म्हशींचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये अधिक प्रमाणात बाधित जनावरे आढळून आली असून अशा गावातील २८५० निरोगी जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बेळगाव तालुक्यात अधिक प्रमाणात या रोगाचा फैलाव झाला आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने यावर औषधोपचार सध्या उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
यामुळे मृत्युमुखी पडणारी जनावरांची संख्या अधिक होत चालली आहे. लिंपीस्किन या आजारामुळे जिल्ह्यात अद्याप एकाही जनावराचा मृत्यू झाला नसल्याची नोंद पशुसंगोपन विभागाकडे आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोपही होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात १३ लाखांहून अधिक पशुधन आहे. बाधित जनावरांपैकी ४८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. या आजारातून बरे होण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असून रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच त्याचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे.
या रोगाची लागण झाल्यानंतर जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन जनावरे अशक्त बनत आहेत. दुधाची क्षमता कमी होणे, भूक मंदावणे, रक्तस्राव अशी लक्षणे दिसून येत असून अशी लक्सगने आढळून येताच पशुपालकांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून जनावरांवर औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहन पशुसंगोपन खात्यातर्फे करण्यात आले आहे.