गुजरात मधील पोरबंदरच्या दक्षिणेला आग्नेय अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो वायव्यकडे सरकून त्याचे ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळात रूपांतर झाले असून ज्याचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून प्रसिद्ध देण्यात आली आहे.
आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा गोव्यापासून 950 कि.मी. तर मुंबईपासून 1,100 कि.मी. अंतरावर आहे. त्याचप्रमाणे कमी दाबामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ गुजरात मधील पोरबंदरच्या दक्षिणेला 1,990 आणि पाकिस्तान येथील कराचीपासून 1,490 कि.मी. अंतरावर आहे.
या 24 तासात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढवून उद्या गुरुवारी त्याचे तीव्र चक्रीवादळात तर शुक्रवारी 9 जून रोजी संध्याकाळपर्यंत अती तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. केरळ कर्नाटक किनारपट्टीसह लक्षद्वीप मालदीव आणि कोंकण गोव्याच्या किनारपट्टीवर उद्या 8 ते 10 जून दरम्यान समुद्र खवळलेला असणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा मान्सूनच्या वाटचालीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यामुळे मान्सूनचे आगमन आणखी लांब होऊ शकते अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे. किनाऱ्यालगत समांतर दिशेने जाणाऱ्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढणार आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या वाटचालीवर मान्सूनचे केरळातील आगमन व पुढील प्रगती ठरणार आहे.
‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेने मान्सून केरळमध्ये 8 किंवा 9 जूनला येण्याची शक्यता वर्तवली असून त्याचे आगमन सौम्य असेल. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मान्सूनचे वारे केरळच्या किनारी भागात पोहोचल्यावर ते सहजासहजी पश्चिम घाट ओलांडू शकणार नाहीत असाही संस्थेचा अंदाज आहे.