विमानाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांना कोरोना तपासणीच्या निगेटिव्ह अहवालाची सक्ती मागे घेण्यात आली आहे. आता कोरोना अहवाल सक्तीचा नसल्यामुळे मुंबई, अहमदाबाद आदी ठिकाणाहून येणारे प्रवासी बेळगावला विनाअडथळा येऊ शकणार आहेत.
कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने आंतरराज्य प्रवास बंद केला आहे. राज्यात प्रवेश करताना कोरोना चांचणीचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. पण हे केवळ बस आणि रेल्वेसाठी लागू असून विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत अशा प्रकारच्या चांचणी अहवालाची सक्ती मागे घेण्यात आली आहे. विमानाने कोरोना बाधित येणार नाहीत असा कयास शासनाने बांधला आहे. मात्र कोरोना लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना अहवाल आणावा लागणार आहे.
याआधी कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आत काढलेला कोरोना चांचणी अहवाल प्रवाशाने सोबत आणणे आवश्यक होते. तशी सूचनाही विमान कंपन्यांना देण्यात आली होती. पण आता आयसीएमआरने त्याची आवश्यकता नसल्याचे म्हंटले असून तसे पत्र कर्नाटक सरकारला पाठविले आहे.
त्यानुसार राज्याचे आरोग्य खात्याचे मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी बेळगाव विमानतळ प्राधिकरणाला पत्र पाठविले असून त्यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, चंदीगड येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना आरटी -पीसीआर हा कोरोना निगेटिव्ह असलेल्या चांचणीचा अहवाल सोबत आणणे सक्तीचे नाही असे नमूद केले आहे. त्यामुळे या राज्यांतून कर्नाटकात येणाऱ्यांना प्रवाशांना यापुढे अडचण येणार नाही.