म्यूकोर मायकाॅसिस अर्थात ‘ब्लॅक फंगस’ हा कोरोना रोग नाही. तथापी कोरोना प्रमाणेच शरीरातील प्रतिकार शक्ती कमी झाल्याने होणारा आजार असून थोड्या उपायांनी आपण त्याला पसरण्यापासून रोखू शकतो, अशी माहिती सुप्रसिद्ध वैद्य डॉ. माधव प्रभू यांनी दिली.
कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आता ‘ब्लॅक फंगस’ या आजाराने डोकं वर काढलं असून त्याने कांही जणांचे बळी देखील घेतले आहेत. या ब्लॅक फंगसबाबत बेळगाव लाईव्हला माहिती देताना डॉ माधव प्रभू म्हणाले की, ब्लॅक फंगस हा कोरोना नसून ती म्यूकोर मायकाॅसिस नांवाची फंगस अर्थात बुरशी आहे.
म्यूकोर मायकाॅसिसमुळे माणसाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते. कोरोना विषाणू संक्रमणामुळेही माणसाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते. कोरोनावरील उपचारासाठी आम्ही विशिष्ट संप्रेरक जीवनसत्वे अर्थात स्टिरॉइड देतो. या स्टिरॉइडमुळे देखील प्रतिकार शक्ती कमी होते. अशा लोकांना जर मधुमेह असेल तर या सर्व गोष्टी मिळून आरोग्यावर परिणाम करतात आणि ज्या लोकांना आजार होणार नाही अशांना आजार सुरु होतात. त्यातला एक प्रकार म्हणजे म्यूकोर मायकाॅसिस होय.
हा आजार कसा पसरतो तर जेंव्हा कोरोना मुक्त रुग्ण घरी जातो, त्यावेळी घरातील अस्वच्छ भाग, धूळ किंवा ऑक्सिजनचे अस्वच्छ पाईप अशा गोष्टींमधून तो फंगस नाकावाटे सायनसीसमध्ये जाऊन डोळ्याला लागून मेंदूपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे जीविताला धोका निर्माण होतो. म्यूकोर मायकाॅसिस ही फंगस थोड्या उपायाने पसरण्यापासून आपण रोखू शकतो. यासाठी घरी धूळ वगैरे असेल तर फेस मास्क वापरला पाहिजे. ऑक्सीजन पाईप स्वच्छ धुऊन घेतली पाहिजेत. तिसरी गोष्ट बेटॅडिन गार्गलिंग म्हणजे बेटॅडिन गुळण्या वारंवार कराव्यात आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी. एवढ्या गोष्टी केल्या तर ब्लॅक फंगस होणार नाही, असे डॉ प्रभू यांनी स्पष्ट केले.
बिगर सरकारी कोविड केअर सेंटरमधून आज असंख्य कार्यकर्ते कोरोना वॉरियर्स कार्यरत आहेत त्यांनी घ्यावयाच्या खबरदारी बाबत बोलताना डॉ प्रभू म्हणाले की, सध्याच्या अतिशय संसर्गजन्य परिस्थितीत या कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतरांचे भान बाळगले पाहिजे आणि मास्क वापरलाच पाहिजे. कामाच्या घाईगडबडीत कांही जणांना याचा विसर पडतो तसे होता कामा नये.
तिसरी महत्वाची गोष्ट कोरोना प्रतिबंधक लसीकरण. माझे प्रशासनाला अपील आहे की कोरोना संदर्भात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून लस दिली जावी असे सांगून पोलिसांप्रमाणे त्यांना बोलावून प्राधान्याने त्यांचे लसीकरण केले गेले पाहिजे, असे डॉ माधव प्रभू यांनी स्पष्ट केले.