बेळगाव महापालिकेच्या गोवावेसे व्यापारी संकुलातील बेळगाव वन कार्यालयात गर्दी होऊन कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत असून या ठिकाणची कर्मचारी संख्या पूर्ववत करावी. तसेच येथे शिस्त लावण्यासाठी एका अटेंडरची नियुक्ती केली जावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात काल पासून अनलॉक जारी झाला असून बहुतांश व्यवहार सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ववत सुरू झाले आहेत. बेळगाव महापालिकेच्या गोवावेसे व्यापारी संकुलातील बेळगाव वन कार्यालयाचे कामकाज देखील सुरू झाले आहे.
सदर कार्यालयात कालपासून घरपट्टीसह इतर कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तथापि अनलॉक मार्गदर्शक सूचनेनुसार बेळगाव वन चालकांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के कमी केली आहे. परिणामी कार्यालयीन कामकाज संथ गतीने सुरू असल्यामुळे जागेअभावी याठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडविला जात आहे. त्याचप्रमाणे घरपट्टी भरण्यास विलंब होऊन इतर कामांचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात हभप शंकर बाबली महाराज आणि रमेश चौगुले यांनी काल बेळगाव वन चालकास जाब विचारला. यावरून उभयतांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. प्रशासनाला विनंती करून कामकाज त्वरेने व्हावे यासाठी बेळगाव वन मधील कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ववत करावी आणि कार्यालयात होणाऱ्या गर्दीला सामाजिक अंतराच्या नियमानुसार शिस्त लावण्यासाठी एका अटेंडरची नियुक्ती केली जावी, अशी मागणी यावेळी बाबली महाराजांनी केली.
यावेळी बाबली यांनी गर्दी झाल्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमाचे होत असलेले उल्लंघन निदर्शनास आणून दिले. प्रत्युत्तरादाखल बेळगाव वन चालकांनी आम्ही सरकारच्या नियमानुसार काम करणार, तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची त्यांच्याकडे करा, असे उद्धट उत्तर दिल्यामुळे उपस्थितांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत होती.
तेंव्हा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोवावेस व्यापारी संकुलातील बेळगाव वन कार्यालयाचे कामकाज वेगाने होऊन या ठिकाणी होणाऱ्या गर्दीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.