कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उद्या शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून सुवर्ण विधानसौध येथे ते कोरोना परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उद्या शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून उद्या शुक्रवारी सकाळी बेळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सुवर्ण विधानसौध येथे ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून तेथून ते धारवाडकडे रवाना होणार आहेत. एकंदर मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यादरम्यान बेळगाव शहरात येणार नसून सांबरा विमानतळावरून थेट सुवर्ण विधानसौध येथे जाणार आहे. त्यामुळे सुवर्ण विधानसौध येथील बैठकीत किती लोकप्रतिनिधी कोरोना नियंत्रणाखाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाय योजनांमधील त्रुटी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वसामान्य आकाराचे तीन जिल्हे सामावतील इतका हा जिल्हा मोठा आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्याला सरकारी मदत कमी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यातील आमदार -खासदार हे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांकडे ऑक्सीजन कमतरता, बेड्स आदींपैकी कोणत्या सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
खास करून बीम्स (सिव्हिल) हॉस्पिटलबाबत अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव दौरा आयोजित केल्याचे आणि बीम्सचे संचालक डाॅ. विनायक दास्तीकोप्प यांना दोन दिवसांपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या बैठकीस जिल्ह्यातील अकरा आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आमदारांकडून विशेषता विरोधी पक्षाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील बीम्स हॉस्पिटलमधील सावळा गोंधळ पाहता या हॉस्पिटलला एक आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या बैठकीस माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण वादग्रस्त अश्लिल सीडी प्रकरणानंतर ते पुन्हा सामाजिक कार्यात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार का? याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.