बीपीएल रेशनकार्ड असल्यास सरकारकडून 2 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैशाची लुबाडणूक करणाऱ्या सेवा सिंधू केंद्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी धारेवर धरून लोकांचे पैसे परत करण्यास भाग पाडल्याची घटना आज रविवारी चव्हाट गल्ली येथे घडली.
चव्हाट गल्ली येथील सेवा सिंधू केंद्रातील कांही कर्मचारी बीपीएल रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकारकडून 2 हजार रुपये देण्यात येत आहेत. तरी या योजनेचा लाभ मिळून देण्याकरिता फक्त 100 रु. आणि आधार कार्ड ,बँक पासबुकची आवश्यकता आहे, अशी बतावणी करत जनतेकडून पैशाची लूट करण्यास सुरू केली होती.
ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांना निदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीची अधिकृत शहनशी करून घेतली. त्यावेळी संबंधित कर्मचारी सर्वसामान्य जनतेची निव्वळ फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.
तेंव्हा सुनील जाधव यांनी सेवा सिंधू केंद्राच्या चालकासह कर्मचाऱ्यांना धारेवर धरून गोरगरीब जनतेचे पैसे परत देण्यास भाग पाडले. तसेच कोविड काळात लोकांनी सरकारी योजनेच्या बाबतीत सतर्क राहावे. बरेच एजंट सरकारी योजनेबद्दल खोटी माहिती देत असतात, त्यासाठी संबंधित योजनांची संपूर्ण माहिती जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावी जेणेकरून भविष्यात फसवणूक होणार नाही.
पैशाच्या बाबतीत सतर्क राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केले आहे. यावेळी बाळू नाईक, भास्कर चव्हाण वामन शाहपूरकर, सागर नावगेकरसह अन्य नागरिक उपस्थित होते.