कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपा नेते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले असलेले पहायला मिळाले.
जारकीहोळी यांनी हिंदूबाबत असभ्य वक्तव्य केले आहे. त्यांनी तातडीने माफी मागावी. देशात काँग्रेसने कधीही हिंदू धर्माची बाजू घेतली नाही. त्यामुळेच असे प्रकार होत आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली यांनी, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाच्या बाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. यावर तीन न्यायमूर्तींनी निकाल दिला आहे. हिंदू धर्म हा जीवनपद्धती म्हणून मांडला गेला. तेव्हा देशाने त्याचे स्वागत केले. काँग्रेस नेत्यांची भूमिका हिंदुत्वाच्या बाजूने कधी नव्हतीच. भारतात राहून हिंदू शब्दालाच अश्लिल म्हणण्याचा प्रकार निषेधार्थ आहे, त्यांनी माफी मागावी. असे सांगितले.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी, पर्शियन भाषेत हिंदू म्हणजे अश्लील असे विधान करणे चुकीचे आहे. सतीश जारकीहोळी यांना कागदपत्र आणू द्या, मीसुद्धा वैयक्तिक चर्चा करण्यास तयार आहे असे ते म्हणाले.
राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, काँग्रेस कधीही देशाच्या किंवा हिंदूंच्या बाजूने राहिली नाही. सतीश जारकीहोळी यांनी हिंदू असभ्य असल्याचे वक्तव्य केले आहे, हे निंदनीय आहे.पत्रकार परिषदेत आमदार अनिल बेनके आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
बेळगाव भाजपच्या वतीने बुधवारी सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी ही माहिती उपलब्ध झाली आहे.