बेळगाव शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच चोरट्यांनी आता चंदन चोरीकडेही मोर्चा वळवला आहे. हनुमान नगर दुहेरी रस्त्याच्या दुभाजकावर असलेले चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला असून लोकांची चाहूल लागताच चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगुंदी आणि सोनोली येथे मंदिरात चोरीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 8) पहाटे हनुमानगर या उच्चभ्रू वस्तीच्या दुभाजकात असलेल्या चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न उघडीस आला आहे.
विनायक मंदिराकडून हनुमाननगरकडे जाणार्या दुहेरी रस्त्याच्या दुभाजकात काही चंदनाची झाडे आहेत. या झाडांना आता चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रात्री चंदनाचे झाड तोडण्यात आले असून लोकांची चाहूल लागताच चोरट्यांनी तोडलेले झाड तेथेच टाकून तेथून पोबारा केला आहे.
चंदनाचे झाड खूप मौल्यवान असते. त्यामुळे अशा झाडांच्या संरक्षणाकडे वन खात्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आता नागरी वस्ती असलेल्या हनुमाननगर सारख्या परिसरात चंदन चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत.
याआधीही परिसरातील अनेक झाडे चोरीला गेली आहेत. पण, वन खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले असून लोकांत संताप व्यक्त होत आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून दुभाजकातील चंदन झाड तोडलेल्या चोरट्यांचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.