खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्याय कारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.
गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. याचा फटका शेतकरी आणि उद्योजकांना बसत आहे. या गावांसाठी कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तरी या निवेदकाची दखल घेऊन बैलूर परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
राज्य सरकारने प्रति युनिट मागे 30 पैसे दरवाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून सामान्य जनता आणि शेतकरी या महागाईत होरपळून जाणार आहेत. त्यामुळे तत्काळ दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी हेस्कॉमचे उपमुख्य कार्यकारी अभियंता नमित ईजारी यांना निवेदन दिले. यावेळी सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नावलकर, विनायक सावंत, बैलूर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नाकाडी, दामोदर नाकाडी, भुपाल पाटील ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.