मुख्य रस्त्यावर पडलेली विद्युतभारीत तार वेळेत बाजूला काढल्याने होणारा संभाव्य अनर्थ टळला आहे.सामाजिक कार्यकर्ते बालाजी जोशी यांनी दाखवलेल्या सतर्कतेने हा धोका टळला आहे. खडे बाजार शहापुर येथील सराफ गल्ली कॉर्नरजवळ रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की खडे बाजार शहापूर सराफ गल्ली कॉर्नर जवळ विद्युतदिप खांब्याची विद्युक्तभारित तार तुटून रस्त्यावर पडली होती.
सदर तार बालाजी जोशी यांच्या नजरेस पडताच त्यांनी इतरांना याची माहिती दिली व तात्काळ हेस्कॉम अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले त्या अगोदर विद्युत पुरवठा बंद केला व रस्त्यावर पडलेली तार बाजूला काढली.
खडे बाजार शहापुर हा नेहमी वर्दळीचा रस्ता असतो मात्र संपूर्ण लॉक डाऊनमुळे या रस्त्यावर रविवारी वर्दळ नव्हती त्यामुळेदेखील संभाव्य अनर्थ टळला आहे.
आगामी पावसाळ्यात अश्या घटना टाळण्यासाठी मनपा आणि हेस्कॉमने योग्य पाऊले उचलावीत अशी मागणी वाढू लागली आहे.