Sunday, September 8, 2024

/

रिंग रोड प्रकल्प हाणून पाडणार -येळ्ळूरवासियांचा निर्धार

 belgaum

राष्ट्रीय महामार्ग व रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती 10 ते 12 कि. मी. अंतरावर रिंग रोड तयार करण्याची योजना आखली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. यासाठी रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीने आयोजित केलेल्या रिंग रोड विरोधी चाबूक मोर्चा जागृती सभेत येळ्ळूरवासियांनी केला आहे.

येळ्ळूर श्री चांगळेश्वरी मंदिरात काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते. यावेळी बोलताना बेळगाव तालुका महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, रिंग रोडमुळे येथील शेतकरी भिके कंगाल होणार असून उरली सरली जमीन सुद्धा सरकार ताब्यात घेणार आहे. शेत जमीनी शाबूत राहिल्या तरच आपला शेतकरी वाचेल, असे सांगितले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष भाई राजाभाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या लढ्यात येळ्ळूरने महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिली शेतकरी संघटना या गावात उभी ठाकली होती. त्या संघटनेने अनेक लढे देऊन जिंकले आहेत. रिंग रोडला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई महत्त्वाची आहे असे सांगून महात्मा ज्योतीराव फुले पुण्यतिथी दिवशी हा चाबूक मोर्चा होतो आहे, हेही आवर्जून सांगितले. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी या चाबूक मोर्चात सर्व भाषिक शेतकरी प्रचंड संख्येने सामील होतील आणि हा रिंग रोड गाढून टाकतील, असे ठणकावून सांगितले.Yellur meet mes ring road

श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी मोर्चात फक्त शेतकऱ्यांनी सहभागी न होता शेतकरी अथवा शेतीशी निगडित प्रत्येकाने म्हणजे शेतकऱ्यांच्या पै-पाहुन्यांसह सर्व थरातील नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. बेळगाव परिसरातील भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना भूमिहीन करणे, त्यांना देशोधडीला लावणे हे एकच धोरण सरकारने अवलंबले आहे. त्याच्या विरोधात मोर्चाला पाठिंबा देऊन तो यशस्वी करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान कार्यरत आहे. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. सोमवारच्या मोर्चात आम्ही सर्वजण बहुसंख्येने सहभागी होऊ. आपण हा मोर्चा इतका विराट काढायचा आहे की सरकारच्या अधिवेशनापूर्वी रिंग रोडचा प्रस्ताव रद्द झाला पाहिजे असे सांगून भविष्यात कोणीही पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही असे आपले आंदोलन झाले पाहिजे, असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, ॲड. श्याम पाटील. ॲड. सुधीर चव्हाण, विकास कलघटगी, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, एस. एल. चौगुले इत्यादींनी आपले विचार मांडले. येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी मोर्चाला येळ्ळूरगावचा पाठिंबा व्यक्त केला. युवा समितीचे उपाध्यक्ष दत्ता उघाडे यांनी प्रास्तावित केले. येळ्ळूर विभाग समितीचे चिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले. या जागृती सभेला येळ्ळूर विभाग एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य राजू पावले, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, शिवाजी सायनेकर, गोपाळ शहापूरकर, नारायण बसवाडकर, परशराम घाडी, प्रकाश मालूचे वाय. सी. इंगळे, नागेंद्र पाखरे, दौलत पाटील, बंडू देसाई, पांडुरंग मेलगे, शांताराम बेडके, प्रकाश पाटील, भरत मासेकर, सौ. मनीषा घाडी शालन पाटील, वनिता परीट, मनोहर घाडी, शिवाजी कदम आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. शेवटी कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.