बेळगावमध्ये मांजाच्या वापरामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून याची दखल घेत पोलिसांनी मांजा विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे.
मांजामुळे अनेकवेळा घडलेल्या दुर्घटनेत अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वार, पादचारी आणि सर्वाधिक त्रास पक्ष्यांना सहन करावा लागला आहे. गेल्या दोन वर्षात मांजामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याचा विचार करून पोलिसांनी बंदी घातलेल्या मांजाचा वापर मात्र अद्यापही थांबलेला दिसून येत नाही. आज मार्केट पोलीस स्थानकाच्या इमारतीवर याचा प्रत्यय आला असून पोलीस स्थानकावर अडकलेल्या मांजामुळे एक घुबड जखमी झाले आहे.
जखमी अवस्थेतीतील घुबडाला अग्निशामक दलाच्या पथकाने जीवदान दिले असून आय. एम. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घुबडाला वाचविले आहे. शुक्रवारी देखील मांजामुळे एक पक्षी अडकल्याची बातमी पुढे आली होती.
बेळगाव शहर परिसरात मांजामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आल्याचा आदेश पोलीस विभागाने जारी केला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचेच दिसून येत आहे.
केवळ प्रसारमाध्यमांवर असे आदेश जारी होत असून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.