मंगाई नगर, वडगाव येथे जाणारा मार्ग खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी मंगाई नगर रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
वडगावमधील मंगाई नगर येथील रहिवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर कंपाउंड घालून रस्ता बंद करण्यात आल्याने या परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
आपल्या घरी जाण्यासाठी येथील रहिवाशांना रस्ताच उपलब्ध नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी या रहिवाशांनी निदर्शने करून आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
या आंदोलनात मोठया संख्येने महिलांचा सहभाग होता. संतप्त महिलांनी यावेळी आपल्यासमोर उद्भवलेल्या समस्येविषयीचे गाऱ्हाणे मांडले. मंगाई नगर दुसऱ्या क्रॉसजवळील जागामालकाने कंपाउंड घालून रस्ता बंद केल्याने सर्वांची मोठी गैरसोय होत असून रस्ता नसल्याकारणाने आसपासच्या अडचणीच्या मार्गावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. यावेळी अनेकवेळा अपघात होत असून अडचणीच्या जागेतून जाताना अनेकांच्या हात-पायाला दुखापत झाली आहे.
दिव्यांग व्यक्तींची यामुळे सर्वाधिक गैरसोय झाली असून सदर रस्ता तातडीने खुला करून समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी मंगाई नगर मधील बहुसंख्य नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.