न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेतल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बायपासचा प्रकल्प रद्द होईपर्यंत रस्त्यावरील लढाई सुरूच ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने गेल्या गुरुवारी महामार्ग प्राधिकरणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे 2009 पासून बायपास विरोधात लढा देणारा शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे.
मात्र भविष्यातही प्राधिकरण विरोधात न्यायालय लढा कायम ठेवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत लवकरच बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे सदर अवमान याचिका लवकरात लवकर दाखल केली जाणार आहे. तसेच बायपास रस्त्यासाठी घालण्यात आलेला मातीचा भराव लवकरात लवकर हटवण्याची मागणी देखील केली जाणार आहे.