Saturday, November 23, 2024

/

देवस्थान पंचकमिटीच्या मागणीला मिळणार यश!

 belgaum

ग्रामदेवता श्री रेणुकादेवी आणि श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवासाठी गदगा स्थळ निश्चित करण्यासाठी आज आमदार अनिल बेनके आणि शिष्टमंडळाने केएसआरटीसी अधिकारी व कंत्राटदार नवलगोंद यांच्यासमवेत या जागेची पाहणी केली.

बेळगाव जत्रा उत्सव कमिटी व बेळगावच्या सर्व देवस्थान कमिटीच्या मागणीप्रमाणे बेळगावात सेकंड डेपो येथे लक्ष्मी मैदान म्हणून 2 गुंठे जागा राखीव आहे. याठिकाणी ग्रामदेवता व श्री रेणुकादेवी व महालक्ष्मी गदगा स्थळ निश्चित करण्यात आले. यासंदर्भात केएसआरटीसी अधिकारी आणि कंत्राटदारांशी चर्चा करून दोन गुंठ्यांमध्ये या बांधकामाची सर्व कागदपत्रे तयार करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला. यासाठी बेंगळुरू कॅंटोन्मेंट बोर्डच्या परवानगीची आवश्यकता असून सदर विभागाकडून परस्पर परवानगी घेण्याची हमी यावेळी देण्यात आली.

यासंदर्भात देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्याशी बेळगाव लाईव्ह ने बातचीत केली असता ते म्हणाले, सदर जागा ब्रिटिश काळापासून देवस्थानाची राखीव ठेवण्यात आली आहे. याठिकाणी बस स्थानक होण्याच्या आधीपासून हि जागा यात्रेसाठी निश्चित आहे. मात्र स्मार्ट सिटी विकासांतर्गत या जागेवर बसस्थानक उभारण्यात आले असून देवस्थान कमिटीला निश्चित अशी जागा नाही. या परिसरात अनेक वर्षांपासून पौष महिन्यात येणाऱ्या श्री यल्लम्मा – रेणुका देवी यात्रेच्या दरम्यान बेळगावमधील भाविक नवगोबाची यात्रा म्हणून साजरी करतात. पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या यात्रेच्या दरम्यान श्री क्षेत्र सौंदत्ती येथे यात्रा करून आलेले भाविक याच जागेवर वास्तव्य करतात. त्यानंतर येथे मोठी यात्रा भरविली जाते आणि त्यानंतर सर्व भाविक आपल्या घरी प्रयाण करतात, अशी पूर्वापार परंपरा चालत आली आहे. कॅंटोन्मेंट बोर्डमध्ये देवस्थान कमिटीच्या नावेच या जागेचे उतारे आहेत. गेल्या २ वर्षात कोविडमुळे यात्रा-उत्सव साजरे न झाल्याने या जागेची मागणी प्रलंबित होती. मात्र आमदार अनिल बेनके यांच्याकडे सातत्याने देवस्थान पंचकमिटी पाठपुरावा करत असून, आमदारांनी यंदा हे कार्य सकारात्मक पद्धतीने घेत स्वतः लक्ष देऊन सदर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत.Devasthan committee

पूर्वीच्या जागी गदगा होत्या. मात्र विकासकामांतर्गत या गदगा हलविण्यात आल्या. आजही काही गदगा सीबीटी परिसरात आहेत. त्यानंतर या परिसरात बसस्थानक इमारतीचा आराखडा बनविण्यात आला. याचदरम्यान या जागा सैन्यदलाच्या असल्याचे आढळून आल्याने या जागेवर सैन्यदलाने कोणतेही विकासकाम करण्यास परवानगी दिली नाही. मात्र यानंतर शिवाजी नगर येथील सेकंड डेपो येथे पर्यायी ३४ गुंठे जागा देऊन बसस्थानक त्याठिकाणी हलविण्यात आले होते. यादरम्यान ज्या ज्या वेळी यात्रा भरविल्या जातात, त्या-त्या वेळी बसस्थानक खाली करून यात्रेसाठी जागा मोकळी करून देण्यात येत होती. जे जे अधिकारी याठिकाणी रुजू व्हायचे त्यांना आधी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तशा सूचनाही दिल्या जायच्या. मात्र सध्या हे करणे शक्य नसून देवस्थान पंचकमिटीची २ गुंठे राखीव जागा पर्यायी जागेवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी गेले अनेक दिवस मागणी करण्यात येत असून पुढील पिढीला शाश्वत जागा उपलब्ध राहावी, यादृष्टीकोनातून हे प्रयत्न सुरु आहेत. नवगोबा यात्रेसह, मरगाई यात्रा आणि लक्ष्मी यात्रा, जग आणि सासन काठ्या यासाठी हि जागा महत्वपूर्ण आहे. केएसआरटीसीच्या एकूण ३४ गुंठे जागेपैकी २ गुंठे जागा हि यात्रेसाठी राखीव ठेवण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव, ठराव आणि मंजुरी याचे कागदपत्र देखील पुरविण्यात येणार आहेत. सदर जागा निश्चित झाली कि बेळगावमधील भाविकांना यात्रा करण्यास मोकळीक मिळणार आहे. यासाठी केएसआरटीसी, सैन्यदल आणि देवस्थान कमिटीमध्ये करारनामा करून देण्याचीही मागणी करण्यात आली असून लेखी स्वरूपात हमी देण्याबद्दल सांगण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार अनिल बेनके स्वतः जातीने लक्ष घालणार आहेत, अशी माहिती रणजित चव्हाण पाटील यांनी दिली.

यावेळी के एस आर टी सी चे संजय राजस, कंत्राटदार नवलगोंड, रणजित पाटील, राहुल मुचंडी, राजू हलगेकर, नागेश लंगरकांडे, इंद्रजित पाटील, डी एम कांबळे, सोमाण्णा अंगडी, एन. आर. टीम्मारेड्डी, दिनेश सर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.