देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपच्या कार्यकाळामध्ये पाच वर्ष सीमा समन्वयक मंत्री असणारे चंपा उर्फ चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला कधी पाऊलही टाकले नव्हते मात्र त्या उलट गोकाक येथील कार्यक्रमात कन्नड धार्जिणे गीत गाऊन मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले होते. बेळगावात साधी एक मराठी माणसाची बैठकही घेतली नव्हती, किंवा महाराष्ट्रात त्यांनी त्या संदर्भात कोणते कामही केले नव्हते. आपली आणि आपल्या पक्षाची कातडी बचाव धोरण स्वीकारणारे चंपा आता मात्र एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी दिमाखात बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. कर्नाटकचा अभिमान आणि मराठी माणसाचा अपमान करणारे चंद्रकांत पाटील मराठी भाषिक सीमावासियांचे शत्रू ठरत आहेत.
मराठी भाषिकांच्या जीवावर महाराष्ट्रात मंत्रिपद भोगणाऱ्या चंद्रकांत दादांना नेहमीच पुळका मात्र कर्नाटकाचा येतो या पाठीमागचे गौडबंगाल काय आहे? दादा हे घातकी राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणूनच कोल्हापूरच्या जनतेने त्यांना नाकारले आहे . कोल्हापूरचे पालकमंत्री असतानाही चंद्रकांत दादांना पुण्याला जाऊन निवडणूक लढवावी लागली यावरूनच त्यांची राजकारणातील नीतिमत्ता दिसून येते, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड येथील तत्कालीन विद्यमान महिला आमदारांचा मात्र राजकीय बळी दिला. त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ब्राह्मण महासंघाला थुका लावायचे काम मात्र त्यांनी पद्धतशीरपणे केले त्या चंद्रकांत दादा पाटलांनी सीमा समन्वयक मंत्री पदाच्या कारकिर्दीत सीमा भागातील मराठी भाषिकांना वाऱ्यावर सोडून मराठी द्रोह केला आहे असा आरोप होत आहे. कन्नड प्रशासनाकडून मराठी जनतेवर होणारा अत्याचार चंद्रकांतदादा पाटील यांना दिसत नाही.
मराठी बाया बापड्यांच्यावर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला त्यांना आठवत नाही. सीमावासियांनी मराठी पत्रकासाठी केलेल्या केलेल्या आंदोलनाचा त्यांना गंध देखील नाही. मागील वर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड संघटनांनी केलेल्या शाईपेकीचे त्यांना काही सोयर सुतक नाही. एक नोव्हेंबरच्या काळ्या दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा प्रतिनिधी पाठवण्याचे वचन दिले असताना कोणत्याही मंत्र्याने बेळगावकडे ढुंकुनही पाहिले नाही. रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागला आहे, त्यामुळे बहुतांशी मराठी शेतकरी उध्वस्त होणार आहे याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही असेही जनतेचे म्हणणे आहे.
दादा उच्च शिक्षण मंत्री आहेत मात्र बेळगावातील मराठी शाळा बंद पडत आहेत, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीतील मराठी विभाग संकटात आहे. गरीब मराठी विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे याचा त्यांनी कधी आढावा घेतला आहे का?मराठी भाषिक शिक्षणाला विरोध करत नाहीत किंवा शिक्षणासंबंधी भूमिकेलाही विरोध करत नाहीत. मात्र चंद्रकांत दादांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीमा भागातील मराठी भाषिक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. चंद्रकांत दादांची सीमावासियांच्या बाबतीतली अफजलखानीवृत्ती महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात यावी त्याचबरोबर एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने चंद्रकांत दादांच्या कृत्याची दखल घ्यावी यासाठी सीमावर्तीयांनी कंबर कसली आहे. अगोदरच महाराष्ट्राच्या जनतेत भाजपच्या गुजरात कनेक्शन मुळे असंतोष पसरला आहे, त्याच्यातच दादांच्या या करनाटकी आगीत तेल ओतण्याचा प्रकार होणार आहे.
लोकांना नीतिमत्तेचे धडे शिकवणाऱ्या चंद्रकांत दादांना मात्र आपल्या पायाखालचा अंधारच दिसत नाही. कोल्हापूरच्या जनतेने झिडकारलेल्या दादांना बेळगावची जनता मात्र म्हणत आहे,’ चंपा तुमचं हे वागणं बरं नव्ह!!!’