लवकरच बेळगाव हे जनतेला 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे राज्यातील पहिले शहर ठरणार आहे. सरकारने लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीला जागतिक बँकेच्या निधीतून बेळगाव शहरासाठी 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा प्रकल्प राबविण्यास अनुमती दिली आहे.
या तीन टप्प्यातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एल अँड टी कंपनी पुढील 4.5 वर्षे सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती आणि देखभाल करणार आहे आणि 5 वर्षात ही नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. हा 24 तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प कार्यान्वित होताच पुढील सात वर्षे हा प्रकल्प एल अँड टी कंपनीच्या ताब्यात असेल. बेळगावप्रमाणे एल अँड टी कंपनी कलबुर्गी आणि हुबळी-धारवाड येथेही या पद्धतीचा प्रकल्प सुरू करणार आहे. सरकारने तेथील पाणीपुरवठा अधिकृतरीत्या हस्तांतरित केला की पुढील कांही महिन्यातच त्याठिकाणी देखील 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रकल्प राबविला जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना एल अँड टी कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ अधिकारी हार्दिक पी. देसाई म्हणाले की, कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन आणि सिटी कार्पोरेशन बेळगाव यांनी जागतिक बँकेतून मिळालेल्या निधीतून बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात म्हणजे सुमारे 92.84 चौरस कि. मी. मध्ये पूर्ण दाबाने 24 तास सतत पाणीपुरवठा करण्याचे काम आमच्याकडे सोपविले आहे. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठामध्ये सुधारणा करणाऱ्या या योजनेअंतर्गत बसवनकोळ येथे जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाईल. त्याचप्रमाणे शहर परिसरात 16 ओव्हरहेड टँक्स आणि तीन पंपिंग हाऊसची उभारणी केली जाणार आहे. याखेरीज संपूर्ण शहरात एमएस, डीआय, एचडीपीई पाईपलाईनचे जाळे निर्माण केले जाईल. तसेच सुमारे 85 हजार घरांना घरगुती पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घातल्या जाणार आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी कांही वर्षापासून प्रायोगिक तत्वावर शहरातील कांही भागात 24 तास पिण्याचे पाणी पुरवठा योजना राबविल्यानंतर सरकारने शहराची संपूर्ण पाणीपुरवठा योजना अधिकृतपणे एल अँड टी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ज्या 10 प्रभागांमध्ये या कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा योजना राबविली होती ती योजना आता कंपनी अधिकृतरीत्या आपल्या ताब्यात घेणार असून आम्ही शहराच्या अन्य भागात अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना एल अँड टी कंपनीकडे केंव्हाच हस्तांतरित केली आहे, अशी माहितीही जगदीश यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार शहरात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या 25 तास पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा व्हिओलिया वॉटर या खाजगी कंपनीकडून राबविली जात होती. मात्र आता पुढील महिन्यात या कंपनीचा सरकारशी असणारा करार समाप्त होणार आहे. बेळगाव शहरात राबविण्यात येणाऱ्या 24 तास पाणीपुरवठ्याच्या देखभालीची सर्व जबाबदारी एल अँड टी कंपनीवर असणार असून याखेरीज पाण्याचे कनेक्शन देणे, मिटर रिडींग, पाण्याची बिले काढणे, ती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, महसूल जमा करणे, पाणीपुरवठा खंडित करणे किंवा पुनश्च सुरु करणे ही कामे देखील कंपनीच हाताळणार आहे. एकंदर नव्या पायाभूत सुविधांची काम पूर्ण होताच. पुढील पाच वर्षात बेळगाव शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत जाणार असल्याचे एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांना अखंड पाणीपुरवठा करणारा हा प्रकल्प देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या बेळगाव शहराला राकसकोप जलाशय आणि हिडकल जलाशयामधून पाणीपुरवठा होत आहे. शहरातील ज्या 10 प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्या ठिकाणी हिडकल जलाशयामधून पाणी पुरवठा केला जातो. शहरात अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे सर्वेक्षण केलेल्या एल अँड टी कंपनीने येत्या 5 वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प पूर्ण होताच संपूर्ण शहराला हिडकल आणि राकसकोप या दोन्ही जलाशयातून 24 तास पाणीपुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.