ज्या शाळेत पर्यावरणाच्या महत्वासह झाडांचे संरक्षण आणि संवर्धनाचे धडे दिले जातात, त्या शाळेच्या आवाराबाहेर मात्र झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत असल्याचा दुर्दैवी प्रकार आज सकाळी कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर पहावयास मिळाल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूल आवारा समोरील रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडांची सध्या कत्तल सुरू आहे. पूर्ण वाढ झालेल्या रस्त्याशेजारील या मोठ्या झाडांमुळे खरेतर वाहतुकीसह विजेच्या तारा वगैरेंना कोणताच अडथळा निर्माण झालेला नाही. मात्र तरीदेखील या झाडांच्या मोठ्या फांद्या हेरून त्या पद्धतशीरपणे तोडण्यात येत आहेत.
सदर प्रकार संशयास्पद वाटत असून कोणाच्या परवानगीने ही वृक्षतोड केली जात आहे? असा सवाल वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडे कांही कंत्राटदार मनमानी करत असून कॅम्प परिसरातील कुठलीही झाडे कशीही तोडून नेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
झाडे आपल्याला नेहमीच फुकट ऑक्सिजन पुरवठा करत असतात. ऑक्सीजनचे महत्व कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी कोरोनामुळे ऑक्सिजन अभावी गुदमरण्याचा अनुभव घेतलेल्यांना ऑक्सीजन म्हणजे काय ते विचारावे.
बऱ्याच रुग्णांनी आपला जीव वाचावा म्हणून अवघ्या 1 किलो ऑक्सिजनसाठी 50 हजार रुपयांपर्यंत पैसे मोजले आहेत. त्यामुळे जर आपण नव्याने झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याऐवजी त्यांची कत्तल करू लागलो तर लवकरच आपण निसर्गाचा क्रोध ओढवून घेणार आहोत, असे मत सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी कामिल बेपारी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केले.
तेंव्हा कँटोन्मेंट बोर्डाने अवास्तव वृक्षतोडीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पैशासाठी विनाकारण चांगली झाडे तोडून पर्यावरणाला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.