जिल्हा रुग्णालयात मोठ्या विश्वासाने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी कृती करू नका. वैयक्तिक मतभेद आणि प्रतिष्ठा बाजूला सारून रुग्णांना सर्वोत्तम उपचार कसे देता येतील यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला वजा सक्त सूचना आज प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासकीय अधिकारी आमलान आदित्य बिश्वास यांनी बीम्समधील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिली.
गरीब जनतेने तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला धक्का लागायला देवू नका गरीब जनता तुमच्यावर विश्वास ठेवून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येते. त्यांना चांगले उपचार दिले पाहिजेत.
तुमचे आपापसातील मतभेद, मतभिन्नता व प्रतिष्ठा हे सगळे बाजूला ठेवून सर्वांनी सेवा बजावावी अशी सूचना बिम्सचे विशेष अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिश्वास यांनी बिम्सच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना केली.
आज सोमवारी सकाळपासून आमलान आदित्य बिश्वास यांनी त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली नवी जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली आहे.
आज सकाळी त्यांनी बिम्सला भेट देवून सर्व वार्ड आणि तेथील कामकाजाची पाहणी केली. या पाहणीनंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तुम्ही फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्स आहात हे ध्यानात ठेवा. तुमची कोणतीही समस्या असेल तर मला सांगा. तुमची समस्या सोडवली जाईल, असा विश्वासही आमलान बिश्वास यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिला.
रविवारी सकाळी आमलान आदित्य बिश्वास हे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे सायकलवरून येवून बीम्स हॉस्पिटलमध्ये फेरफटका मारून गेले होते. ते सायकल वरून पाहणी करून गेलेली बातमी वाऱ्यासारखी पसरताच संबंधित सर्वजण रविवार पासूनच अलर्ट झाले होते.
आमलान बिश्वास यांच्या भेटीप्रसंगी बिम्सचे प्रभारी संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर आदी उपस्थित होते.