कोरोना संकटाच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होतच असून लोकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. अशातच आज मंगळवारी बेळगावात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली, तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. परिणामी समस्त वाहन चालक बेळगावकर सध्या सरकारच्या नांवाने शंख करू लागले आहेत.
इंधन दरवाढीचा विळखा बेळगावकरांच्या मानेभोवती मंगळवारी आणखी घट्ट झाला. मंगळवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 102 रुपये झाला, तर डिझेलचा दर 94 रुपये झाल्यामुळे सर्वसामान्यांवर मोठा भार पडला आहे.
इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटात जगणे कठीण झालेल्या जनतेला आता या महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात लोकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पेट्रोल डिझेल दर वाढल्यास इतर वस्तूंचे दर आपोआप वाढतात. त्यामुळे दररोज अशी दरवाढ होत राहिली तर राबून खाणाऱ्यांनी जगायचे तरी कसे? असा सवाल केला जात आहे. पूर्वी 60 ते 70 रुपयाला मिळणार्या पेट्रोलचा दर आता 102 रुपये प्रति लिटर पोचला आहे.
हे दर पाहून आपली वाहने घराबाहेर काढू नयेत असे लोकांना वाटू लागले आहे. भारतीयांना कसल्याही प्रकारचे अच्छे दिन आलेले नाहीत. पंतप्रधान मोदी केवळ नांवासाठी आश्वासने देतात. त्यांनी महागाई कमी करून दाखवावी असे नागरिकांत बोलले जात आहे. एकंदर पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. अच्छे दिन कब आएगें असा प्रश्न केंद्र सरकारवर विचारला जात आहे.
मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे झालेली संकट परिस्थिती लक्षात घेऊन किमान आतातरी अंत न पाहता केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.