कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लस घेण्यासाठी रितसर रांगेत उभारलेल्या नागरिकांना डावलून वैद्यकीय कर्मचारी आपल्या नातलग व परिचयातील लोकांना इंजेक्शन देत असल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे कांही काळ लसीकरणाचा फज्जा उडाल्याची घटना आज सकाळी भांदुर गल्ली येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भांदूर गल्ली येथील श्री मरगाई मंदिरामध्ये आज शनिवारी कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. सदर मंदिरात कोरोना प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देण्यात येणार आहे असे समजताच परिसरातील नागरिकांनी मंदिराच्या ठिकाणी गर्दी केली.
त्यावेळी लसीकरणाचे नियोजन करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना तुमचे आधार कार्ड द्या त्यानुसार लसीकरण केले जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे आधार कार्ड जमा करून नागरिक क्रमवार रांगेत उभे राहिले. तथापि सकाळी जेव्हा प्रत्यक्ष कोव्हीशिल्ड लसीचे इंजेक्शन देण्यास सुरुवात झाली त्यावेळी रांगेत उभारलेल्या नागरिकांना टाळून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले पैपाहुणे आणि परिचयातील लोकांना इंजेक्शन देण्यास सुरुवात केली.
सकाळी लवकर येऊन रांगेत उभारलेल्या नागरिकांनी सदर प्रकाराला आक्षेप घेऊन जाब विचारला असता ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनाच इंजेक्शन दिले जाईल असे सांगण्यात आले. तेंव्हा फॉर्म भरायचा होता तर आमचे आधार कार्ड जमा करून का घेतले? असा जाब विचारून उपस्थित नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी जोरदार बाचाबाची सुरू होऊन एकच गोंधळ उडाला. त्याचप्रमाणे फॉर्म घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. परिणामी लसीकरणाच्या कामात कांही काळ अडथळा निर्माण झाला.
या प्रकारामुळे आधार कार्ड जमा करून निर्धास्तपणे रांगेत उभारलेल्या बऱ्याच नागरिकांना फॉर्म अभावी इंजेक्शन न घेताच निराश होऊन घरी परतावे लागले. दरम्यान, प्रथम आधार कार्ड जमा करून घेऊन त्यानंतर फॉर्म भरण्यास सांगण्याद्वारे नागरिकांची दिशाभूल करण्याच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल भांदूर गल्ली परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.