गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी माध्यमातील पाठांचे व्हिडिओ चंदन वाहिनीवर प्रसारित करावेत, अशी मागणी केली जात आहे. मात्र शिक्षण खात्याने मराठी माध्यमातील पाठांचे व्हिडिओ चंदन वाहिनी ऐवजी युट्युबवर दाखविण्याचे निश्चित केले आहे.
कोरोनामुळे शिक्षण खात्यातर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चंदन वाहिनीवरून व्हिडिओ पाठांचे प्रसारण केले जात आहे. गेल्या वर्षी शाळा सुरू होण्यास विलंब होणार असल्याने दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर सुरुवातीला कन्नड व त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ पाठांचे प्रसारण सुरू करण्यात आले.
अनेक महिने उर्दू व मराठीला यामधून डावलले जात होते. त्यामुळे इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षण खात्याने मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरतील असे व्हिडिओ तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार बेळगाव शहर आणि परिसरातील तज्ञ शिक्षकांची मदत घेऊन मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील असे व्हिडिओ पाठ तयार करण्यात आले आहेत. हे पाठ तयार करून अनेक दिवस झाले तरी त्याचे प्रसारण करण्यात आलेले नाही. शिक्षण खात्याने फक्त कन्नड इंग्रजी व उर्दू माध्यमाचे धडे विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवरून देण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे, तर मराठी माध्यमांचे धडे विद्यार्थ्यांना युट्युब वरून घ्यावे लागणार आहेत.
सर्वच विद्यार्थी युट्युबचा वापर करीत नसल्याने विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवरून धडे उपलब्ध करून दिले असते तर बरे झाले असते, असे मत मराठी विद्यार्थी व शिक्षकांनी मधून व्यक्त होत आहे.