कोरोना प्रादुर्भावासह लॉक डाऊनच्या परिस्थितीसमोर एकीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी हार मानली असताना दुसरीकडे एका युवा शेतकऱ्याने या प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करताना मुंबईमधून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त करून घेतला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी येथील आकाश काशेट्टी या युवा शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेत जमिनीमध्ये पिवळ्या आणि नारंगी अशा दोन रंगांच्या झेंडूच्या फुलांचे पीक घेतले आहे. मुंबई येथील फुलांच्या व्यापाऱ्यांकडून या झेंडू फुलांना प्रति किलो 30 ते 45 रुपये अशा दराने मागणी आहे. गेल्या पाच वर्षापासून आम्ही आमच्या स्वतःच्या आठ एकर शेत जमिनीतील 2 एकरमध्ये फुलोत्पादन करतो. उर्वरित सहा एकरमध्ये आम्ही उसाचे पीक घेत असलो तरी कांहीवेळा या पिकापासून आम्हाला म्हणावा तसा नफा मिळत नाही. याउलट फुलांच्या पिकांमधून मात्र आम्हाला नियमित चांगला नफा मिळतो. गेल्या वर्षापासून लाॅक डाऊनमुळे राज्यातील बाजारपेठेत फुलांची मागणी कमी झाल्याने मला नवी बाजारपेठ शोधावी लागली. त्यासाठी मी मुंबई येथील कांही फुल व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. या व्यापाऱ्यांना झेंडूच्या फुलांची अत्यंत गरज असल्यामुळे माझ्या संपूर्ण झेंडू पिकाची खरेदी करून त्यांनी गेल्या महिन्याभरापासून फुलांची उचल करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती बीकॉम पदवीधर असणाऱ्या काशेट्टी याने दिली.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाजारपेठेतील झेंडू फुलांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून आकाशने आपल्या कुटुंबियांना पारंपारिक शेती बरोबरच या फुलांची शेती किती फायदेशीर ठरू शकते हे पटवून दिल्यानंतर त्यांनी त्याला झेंडूचे पीक घेण्यास परवानगी दिली. आमच्या शेतातील झेंडूच्या फुलांची आम्ही सर्वसामान्यपणे कर्नाटकच्या बाजारपेठेमध्ये सरासरी फक्त 30 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्री करत होतो. राज्याच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मागणीही प्रचंड प्रमाणात आहे. परंतु यंदा प्रथमच आम्हाला आमची फुले मुंबईच्या बाजारपेठेत पाठवावी लागली. झेंडूच्या फुलांची वाढती मागणी लक्षात घेता राज्यातील अनेक शेतकरी या फुलांच्या उत्पादनाकडे वळू शकतील असेही आकाश म्हणाला.
काशेट्टी याच्या शेतामध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड करण्यात आलेली 5 ते 6 टन फुले मे महिन्याच्या मध्यावधीला कापणीसाठी तयार होत आली होती. त्यानंतर गेल्या 15 मेपासून आंतरराज्य वाहतूकदारांच्या मदतीने ही झेंडूची फुले ठराविक अंतराने मुंबईच्या बाजारपेठेत पाठविली जात आहेत. हारुगेरी येथून ही फुले घेऊन जाणारे कंटेनर्स सर्व सामान्यता पहाटे 4 वाजता मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचतात. तेथील व्यापारी त्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत त्या फुलांची विक्री करतात आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत डिजिटल पद्धतीने आम्हाला ठरलेले पैसे पाठवून खरेदीचा व्यवहार पूर्ण करता अशी माहितीही आकाशने दिली.
आकाश काशेट्टीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडूच्या पिकासाठी 75 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्या मोबदल्यात त्यांना 2 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आकाश काशेट्टी याला अजून पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी फुलोत्पादनाची आवड त्याला त्यापासून रोखत आहे.