कोरोना बाधितांना आता हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध होत आहेत, शिवाय बेळगाव शहरात ऑक्सिजनची मागणी देखील कमी झाल्यामुळे महापालिकेने स्पोर्ट्स हॉस्टेलमधील ऑक्सिजन सपोर्ट सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.
गेल्या मे महिन्यात बेळगाव शहरात कोरोना बाधितांना ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. त्यावेळी रेड क्रॉस संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) बेळगाव शाखा व महापालिका यांनी एकत्रित येऊन ऑक्सीजन सपोर्ट सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हिंडाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दिले होते त्याचा वापर या सपोर्ट सेंटरसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि स्पोर्ट्स होस्टेल येथे 19 मे रोजी हे ऑक्सिजन सपोर्ट सेंटर सुरू करण्यात आले होते.
बेळगावात एखाद्या कोरोना बाधिताला हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड मिळाला नाही तर त्याला या सपोर्ट सेंटरमध्ये तात्पुरते दाखल केले जावे आणि बेड मिळाल्यानंतर त्याला सेंटरमधून संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल केले जावे अशी हे ऑक्सीजन सपोर्ट सेंटर सुरू करण्यामागची संकल्पना होती.
सदर सेंटर सुरू झाल्यापासून आजतागायत सुमारे 130 कोरोना बाधितांना या सेंटरमध्ये उपचार मिळाले आहेत. आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून ऑक्सीजनची गरज असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या देखील घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने स्पोर्ट्स हॉस्टेलमधील ऑक्सिजन सपोर्ट सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.