गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यामध्ये ब्लॅक फंगसचे नव्याने 17 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या एकूण 87 झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलांमध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बीम्स हॉस्पिटलमध्ये ब्लॅक फंगसच्या 49 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 10 रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. याव्यतिरिक्त विविध सहा खाजगी हॉस्पिटल्समध्ये ब्लॅक फंगसच्या 38 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी समर्पक प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत असून येत्या दोन दिवसात औषधांचा अतिरिक्त साठा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर शेकडा 11 टक्के इतका आहे. गेल्या 24 मेपासून ग्रामीण भागातील गावागावांमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत असून आजवर 800 खेडेगावांमध्ये या टेस्ट झाल्या आहेत. रॅपिड अँटिजन टेस्टमुळे व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही याची तात्काळ शहानिशा होते. त्यामुळे लवकर उपचार करण्यास आणि बळींची संख्या रोखण्यास मदत होत आहे. या टेस्ट करण्यासाठी जिल्ह्यात 135 पथकांची रचना करण्यात आली असून सर्व खेडेगावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मी स्वतः व्यक्तीशः 8 खेड्यांना भेट दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात आजतागायत 1200 कोरोनाग्रस्त रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या 600 जणांवर या सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत. घराऐवजी रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाल्यास त्यांचे कुटुंबीय घरी सुरक्षित राहू शकतात.
हॉस्पिटलमधून सध्या 300 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. कोरोना नियंत्रणाच्या कामात हयगय करणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. एकंदर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाधितांवर उपचारासाठी सर्व ते नियोजन बेळगाव जिल्हा प्रशासनाने केले असल्याचेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.