अश्लील सीडीप्रकरणी एसआयटी पथक आणि कब्बन पार्क पोलिसांनी सलग 4 तासांहून अधिक काळ माजी मंत्री आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांची आज चौकशी केली. चौकशीच्या वेळी कांही प्रश्नांची उत्तरे न देता वकिलांसोबत त्या प्रश्नाबाबत चर्चा करणार असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हंटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसआयटी पथकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जारकीहोळी यांना चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. चौकशीच्या वेळी एसआयटीने व्हिडिओ आणि त्या युवती विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये रमेश जारकीहोळीच असल्याचा पुरावा एसआयटीने पुढे केला आहे. या व्यतिरिक्त त्या युवतीच्या संपर्कात जारकीहोळी असल्याचा पुरावाही एसआयटीने उघड केला आहे. त्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी दोन वेळा पाणी पिल्याचे सांगण्यात आले.
आमदार रमेश जारकीहोळी यांनी कांही प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच एसआयटी अधिकाऱ्यांच्या कांही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने त्यांना पुन्हा त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या चौकशीला आज सकाळी 11 वाजल्यानंतर सुरुवात झाली. रमेश जारकीहोळी यांची कब्बन पार्क पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर मारुती यांनी चौकशी केली. कॅमेरासमोर रमेश जारकीहोळी यांची विधानं तपास अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली. याप्रसंगी टेक्निकल सेलमध्ये आयटीचे वरिष्ठ आयुक्त सीसीबी गुन्हे शाखेचे सहआयुक्त संदीप पाटील उपस्थित होते.