राज्यातील तीनही पोटनिवडणुका आम्हीच जिंकणार आहोत असा विश्वास राज्याचे ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव शहरांमध्ये आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. आमची मजबूत पक्षसंघटना पाहून काँग्रेस आणि जेडीएसला धडकी भरली आहे. मागील पोटनिवडणुका आम्ही जिंकल्या होत्या. आता या पोटनिवडणुकांमध्ये देखील आम्हीच विजय होऊ असे त्यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीप्रसंगी पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी आम्ही 104 जागा जिंकल्या होत्या असेही ते म्हणाले.
अश्लिल सीडी प्रकरणी मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत, याबाबत ते कांहीच का बोलत नाहीत? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ईश्वरप्पा म्हणाले की, सिद्धरामय्या कायम दुतोंडी बोलतात. प्रारंभी मी निवडणुकीला उभा राहणार नाही असे म्हणत शेवटी ते निवडणुकीला उभे राहिले. याला कारण म्हणजे स्वतःच्या विजयाची त्यांना खात्री नाही. ते आत्तापासूनच मी मुख्यमंत्री होणार असे सांगत सुटले आहेत.
तसेच बदामी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे सांगत आहेत. मात्र ते बदामीमध्ये निवडणूक लढविणार नाहीत आणि त्यांनी ती लढवली तर त्यांचा पराभव निश्चित आहे, असेही मंत्री ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी अश्लिल सीडी प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सीडी प्रकरण सोडून दुसरे काहीही विचारा असे ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा पत्रकारांना म्हणाले.